आज मी माझ्या आयुष्यात जे काही कमावलंय त्यात अनेक गोष्टींसोबत माझ्या बाईक रायडींगचाही मोठा वाटा आहे. मी बाईक शिकले नसते तर आज अनेक गोष्टींना मुकले असते. याचा प्रचिती मला पदोपदी येत असते. माझ्या व्यक्तीमत्वाबद्दल बोलायचं झालं तर बाईक शिकण्याअगोदर आणि नंतर असं बोलावं लागेल. पण, हा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता.. प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे
Adventure on Wheels
आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील पुढचा भाग. लहानपणीची सर्वात मोठी आठवण म्हणजे गावी जाणं. पण, त्यातही सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मामाच्या सायकलवरचा प्रवास. बस स्टॅन्ड किंवा स्टेशनपासून गावच्या घरचा प्रवास हा सायकल वरचाच. आमच्या आजोबांनी हट्ट करून वेळेस दम देऊन सायकल शिकण्यास भाग पाडलं. आणि मग पूर्ण सुट्टी फक्त भावंडांसोबत सायकलवरून गाव फिरण्यात जायचं. बहुधा तोच माझा दुचाकींचा पहिला जिव्हाळा. पुढे शिक्षण पूर्ण झालं, नोकरी सुरु झाली, माझं काम तसं कॉर्पोरेट इव्हेंट्स मधलं. ट्रॅव्हल हा माझ्या कामाचा भाग. कामानिमित्त फिरणं चालूच होतं. पण, मनात नेहमीच एक सुप्त इच्छा राहिलेली. बाईक चालवण्याची. लग्न झालं आणि नवरा स्वप्निल नेमका वेलियंट रायडर ग्रुपचा फाउंडर मेंबर, ग्रुप कसला खूप मोठं कुटुंबच ते, सुखः दुखाःत साथ देणारं. आता मात्र खऱ्या अर्थाने माझा दुचाकीवरचा प्रवास चालू होणार होता. पण, प्रश्न खूप होते. आपण वजन पेलवू शकू का? पाय पुरतील का? गाडी पडणार तर नाही ना? ह्या विचारांमध्ये कधी पुढचे प्रयत्न केलेच नाही.
लागोपाठ दोन संकटं दरम्यानच्या काळात मी एका बाळाची आई झाले. सगळं पुन्हा सुरळीत सुरु असतानाच नवऱ्याला आजारपण आलं. ऐन तारुण्यात त्याला पायाचं दुर्मिळ दुखणं सुरू झालं. पण, तोही हार मानणाऱ्यांमधील नव्हता. बोलला लढू आपण. काही थांबणार नाही. हे कमी होतं की काय म्हणून कोरोना आला आणि सगळच ठप्प झालं. एकामागून एक दोन संकटं लागोपाठ आल्याने आमच्यावरही दडपण आलं. काय करावं सुचेना झालं. स्वतःचा पुन्हा नव्याने विचार करायला सुरुवात केली. एकदा स्वप्निलला विचारलं, शिकू शकेन काय रे मी बाईक? आपली बुलेट मला झेपेल का? तू पूर्ण बरा झालास की मलासुद्धा तुझ्यासोबत राईड करायचं आहे. नवऱ्याचे डोळे चमकले, म्हणाला शुभस्य शीघ्रम. लगेच दुसऱ्या दिवशीच स्कुटी वर प्रॅक्टिस चालू झाली. माझी खूप चांगली मैत्रीण अश्विनी ताई ज्यांचा स्वतःचा ओवी दुचाकी ट्रेनिंग स्कूल आहे, त्या साथीला आल्या. स्कुटी वर लगेच हाथ बसला.
आयुष्यातला पहिला अपघात माझ्या आईची साथ होतीच, बाळाचं आवरून सकाळीच घराबाहेर पडून 200 किलो वजनाची अवजड बुलेट शिकणं म्हणजे खायचं काम नाही, हे प्रत्यक्ष शिकताना लक्षात आलं. पण, पाय कसेबसे खाली पुरवत माझी गाडी चालवण्याची कसरत चालू होती. हळूहळू आत्मविश्वास वाढत होता. तोच वाढलेला कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स झाला अन् एका टर्नला खाली पाय ठेवण्यास उशीर झाला अन् ते धूड माझ्या पायावर, मी रोड वर. कधीच रोजचा रस्ता मी एवढ्या जवळून पहिला नव्हता. थोड्या वेळासाठी वाटलं पूर्ण जग माझ्या भोवती फिरत आहे. गाल, कोपर, ढोपर, टाच सगळंच सोलून निघालं होतं, त्यात बुलेटच्या सायलेन्सरचा चटका सर्रकन लागला तो वेगळाच. आता कुठं सुरुवात झाली होती. पण, अपघात झाल्याने डॉक्टरांनी 15 दिवस पूर्ण आराम करण्यास सांगितलं. पण, मी काही डॉक्टरांचं ऐकलं नाही, 5 दिवसात पुन्हा सराव सुरू केला. स्वप्निल सुद्धा हातातलं काम टाकून आजारपण विसरून माझ्यासोबत यायचा. अश्विनी ताईंनी मुंबईचे सगळे रस्ते माझ्यासोबत पालथे घातले. मी पूर्ण तयार झाले. आत्मविश्वास एवढा वाढला की रोज ऑफिसला सुद्धा बुलेटने जायला लागले. येता-जाता कौतुक, कुतूहलयुक्त नजरा, कॉमेंट्स मिळायला लागल्या. मला मोकळं आकाश खुणावू लागलं होतं. आता मला इथेच थांबायचं नव्हतं. एक रिस्क घायची होती. कुठेतरी एकटीने प्रवास करायचा होता. अश्विनी ताईच्या गावाला म्हणजे वरसोलीला 200 कमीचा पल्ला गाठायचं ठरलं. ताई होत्याच पाठीशी. पण, पहिल्यांदाच सोबत ग्रुप नाही, रस्ता धड माहित नाही, घाटाता कधी बाईक चालवण्याचा अनुभव नव्हता. पण, जाण्याचा निश्चय पक्का होता.
मला नवीन पंख मिळाल्याचा भास.. अखेर तो दिवस उजाडला. सगळ्या सेफ्टी गिअर्ससोबत जेव्हा मी घरातून बुलेट बाहेर काढली. तेव्हा मनात काहूर माजलं होतं. पण, शहरातून बाहेर पडत असताना माझ्यातील आत्मविश्वास हळूहळू वाढू लागला. मला नवीन पंख मिळाल्याचा भास झाला. माझी बाईक आणि मी जणू एक झालो होतो. रस्त्याच्या दुतर्फा असलेला निसर्ग, त्यातून बुलटचा फटफट असा आवाज करत निघालेली मी. माझी आपोआप समाधी लागत होती. हेल्मेटच्या आतली शांतता एक प्रकारचा निर्वाण अनुभूती देत होती. आज तर मला ब्रेक मधला चहा सुद्धा वेगळाच वाटला. ज्यावेळी मी वरसोलीला पोहचले, त्या क्षणाला परमोच्च यशाची एक आंतरिक भावना मनात आली. काही क्षणात मी आणि माझी बाईक त्या बीचवरची सेलिब्रिटी झाले, लोक येऊन फोटो काढू लागले, विचारपूस करू लागले. त्यांना माझं खूप कौतुक वाटत होतं. एवढी चिटुकली मुलगी एवढ्या लांबून बाईक वर आली आहे. लोकांच्या प्रतिसादाने माझाही उत्साह वाढला. तो सूर्यास्त माझ्या आयुष्यात एक वेगळाच सूर्योदय करून गेला. अश्विनीताईच्या गावी मस्तपैकी पाहुणचार झाला. आता परतीचा प्रवास सुरू करताना सकाळी निघताना मनात जे काहूर माजलं होतं ते शांत झालं होतं. त्या बोचऱ्या थंडीत अंधाऱ्या काळोख्या रस्त्यामधून गाडी चालवताना आता मला कोणीच थांबवू शकत नाही, ह्या पुढे फक्त आणि फक्त पुढेच जायचं आहे, एव्हढच मनात येत होतं.
त्यानंतर मी माझ्या कुटुंबासोबत, वेलियंट रायडर्ससोबत अनेक राईड यशस्वीपणे पूर्ण केल्या. रस्ता कसलाही असला किंवा कोणताही प्रसंग आला तरी एक रायडर माझ्या पाठीशी उभा राहिला. मला लेडीबर्ड हे नाव बहाल केलं. माझं खूप खूप कौतुक सुद्धा केलं. त्याच्याकडून मी खूप काही शिकले, ग्रुप रायडींग मधली शिस्त, बॉण्डिंग, एकमेकांना सांभाळून घेणं आणि एकमेकांसाठी जीव ओवाळून टाकणं. हा रायडर म्हणजे माझा नवरा स्वप्निल. ह्या पुढेही हा प्रवास असाच जोमाने सुरू राहील. आता मात्र नवऱ्याच्या मागे बसून नाही सोबतीनं खांद्याला खांदा लावून, जसं संसारात साथ देतो अगदी तसच. माझ्या सासऱ्यांचे आशीर्वाद, आईची खंबीर साथ आणि नवऱ्याच्या प्रचंड प्रोत्साहनामुळे, माझी मैत्रीण अश्विनी आणि जागृतीच्या पाठींब्याने आज मी स्वतःला आणि स्वतःच्या अमर्याद क्षमतेला ओळखू शकले आहे.
खरं सांगायचं तर नवऱ्याचं आजारपण आणि कोरोना यामुळे मीही आतून निराश झाले होते. त्याच काळात मी बाईक शिकण्याचा निर्णय घेतला नसता तर कदाचित नैराश्य आलं असतं. बाईक रायडींग ही फक्त माझ्यासाठी बुलेट शिकण्यापुरती मर्यादीत नाहीय. तर कुठल्याही परिस्थितीत मागं सरायचं नाही. नेहमी पुढेच जाण्याचा विचार करण्याचा आत्मविश्वास मला बाईकने दिला. एक दुचाकी आणि प्रवास आपल्या जीवनात किती बदल घडवतो, कोणीतरी म्हटले आहे तुम्हाला पुस्तक जितकं शिकवू शकत नाही. तितका तुम्हाला तुमचा प्रवास शिकवून जातो. - नैना पाबरेकर - लेडीबर्ड - वेलियंट रायडर (Insta ID - valiant_riderz) तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.