माझ्या बाईक रायडींगचा प्रवास कधीही सोपा नव्हता. लहानपणापासून हृदयाच्या कोपऱ्यात हळूवारपणे जपलेलं ते एक सुंदर स्वप्न होतं. ते पूर्ण करण्यासाठी मला आधी 24 वर्ष वाट पहावी लागली. पण, त्यानंतरही मला ते सहजासहजी मिळालं नाही. रायडींग सुरू केल्यानंतर काहीच वर्षात अशी घटना घडली की माझ्या स्वप्नांवर क्षणात पाणी फिरलं. आजही ते दिवस आठवले तरी रडायला येते… प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे
Adventure on Wheels
आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील पुढचा भाग. नमस्कार दोस्तांनो, मी संकेत जाधव.. मूळचा रायगड जिल्ह्यातील असोल तरी सध्या पुण्यातच स्थायिक झालोय. लहानपणापासूनच मला सायकल चालवण्याची भारी आवड होती. आमच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या जुन्या मुंबई पुणे हायवेवरून कधीकधी बाईक रायडर्सचा ग्रुप जायचा. मला ते पाहण्याची आवड लागलेली. मी दर रविवारी माझ्या घरापासून दूर हायवेवर रॉयल एनफिल्डवर रुबाबात जाणाऱ्या बाईक रायडर्सला न्याहाळायचो. तेव्हापासून मी एक ध्येय ठेवलं की एक दिवस माझ्याकडे देखील रॉयल एनफिल्ड बाईक असेल. मीही या मुलांप्रमाणे रुबाबात गाडी चालवेल. माझ्या मनाच्या कोपऱ्यात हे ध्येय घेऊन मी कामाला लागलो. कठोर परिश्रम करत राहिलो. आणि एक दिवस तो सुंदर दिवस उजाडला, ज्याची वाट मी लहानपणापासून पाहात होतो.
स्वप्न पूर्ण होण्यासाठी 24 वर्षे वाट पाहिली लहानपणी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मी रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रा 350 सीसी बाईक बुक केली. गाडी बुक करण्याचा विचार मनात आल्यापासूनच माझ्या मनात उत्साह संचारला होता. लवकरच माझ्याकडे माझी स्वतःची रॉयल एनफिल्ड बाईक येणार असल्याने मी भलताच खूश होतो. पण, बुकिंग करताना सांगितले की किमान 3 महिने तुम्हाला बाईक डिलिव्हरीसाठी प्रतीक्षा करावी लागेल. हे ऐकताच मी निराश झालो. पण, म्हटलं ठीक आहे. स्वप्न पूर्ण होण्यासाठी 24 वर्षे वाट पाहिली आहे, त्यामुळे तीन महिने अधिक वाट पाहिल. शिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय देखील नसल्याने 90 दिवस वाट पाहायचे ठरवले. पण, खरं सांगायचं तर बाईक बुक केल्यापासून अक्षरशः दिवस मोजत होतो. अचानक एक दिवस मला शोरूममधून फोन आला. सर तुम्ही कागदपत्रांच्या पुढील प्रक्रियेसाठी येऊ शकता. हे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमची बाइक घेऊ शकता. मला खूप आनंद झाला मी माझ्या मित्रासोबत शोरूममध्ये गेलो आणि पेपर वर्कची सर्व औपचारिकता पूर्ण करून माझ्या मेहनतीने कमावलेले पैसे बाईक डिलिव्हरी मिळवण्यासाठी दिले.
अचानक बाबांची नोकरी गेली अन्.. बाईक बुक करण्यापासून ते बाईक डिलिव्हरी मिळेपर्यंतचा प्रवास माझ्यासाठी आयुष्यात एक मोठा धडा आहे. आम्ही रायगड जिल्ह्यातून पुण्यात आलो. कारण, वडिलांची कंपनीत उच्च पदावर पुण्यात बदली झाली होती. मात्र, अंतर्गत राजकारणामुळे त्यांची नोकरी गेली. मला त्यावेळी धक्का बसला. अचनाक अशी परिस्थिती उद्भवल्याने मी बाईक घेण्याचा विचार सोडण्याचा निर्णय घेतला. पण बाबा म्हणाले नाही तू असे करू नकोस, अशा अडचणी आयुष्यात येत जात राहतात. पण, तुझा बाईक घेण्याचा प्लॅन रद्द करू नको. अशावेळी माझी द्विधा मनस्थिती झाली. बाईक घ्यावी की नाही कळत नव्हतं. परिस्थिती आणखी बिघडू शकते, याची मला कल्पना होती. पण, माझे बाबा म्हणाले काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे. वडिलांनी धीर दिल्याने मी अखेर धाडस केलं. बुकिंगची रक्कम 5 हजार आणि नंतर 30 हजार डाउन पेमेंट माझ्या स्वत: च्या कष्टाने कमावलेल्या पैशाने दिले. बाकीची रक्कम मी लोन केलं. अशा पद्धतीने माझी स्वप्नातील पहिली बाईक माझ्या घरी आली.
बाईक घेतल्यानंतर ठरल्याप्रमाणे मी शॉर्ट राईड्स आणि सोलो राईड करू लागलो. नंतर माझे काही जुन्या शाळेतील आणि कॉलेजच्या मित्रांना भेटल्यानंतर ज्यांना राईडिंगमध्ये रस होता, त्यांना घेऊन आम्ही ग्रुपने फिरायला सुरुवात केली. वीकेंडला ब्रेकफास्ट राईड, शॉप्ट, लाँग राईड म्हणून बाईक रायडींग सुरू झाली. तब्बल चार दिवस कोमात पण, 2017 मध्ये मला अचानक सन स्ट्रोक आला. यातच अर्धांगवायूचा झटका बसला. मला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तब्बल 4 दिवस मी कोमात होतो. यानंतर माझं आयुष्यच बदललं. कारण, डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की मी उर्वरित आयुष्यात बाईक चालवू शकत नाही किंवा उंच आणि पाण्याच्या ठिकाणी जाऊ शकत नाही. डॉक्टरांच्या या एका वाक्याने क्षणात माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला. माझ्या पायाखालची जमीन सरकली. काही क्षणासाठी तर आता आयुष्यच संपलं. आपण, काहीच करू शकत नाही, असे विचार मनात यायला लागले. पण, स्वतःला सावरलं. काहीही झालं तरी हार मानायची नाही, असं मनोमन ठरवलं. स्वत: वर काम करायला सुरुवात केली. मानसिक, शारीरिकदृष्ट्या पुन्हा मजबूत बनवले. मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मी पुन्हा उभा राहिलो. माझ्या सुंदर बाईकसोबत पुन्हा एकदा नव्या प्रवासाला सुरुवात केली. देवाच्या कृपेने मला हे सर्व मिळाले, यासाठी त्याचे आभार मानले. त्यानंतर दक्षिण आणि उत्तरेकडील अनेक ठिकाणांना भेट दिली. भूतानच्या सुंदर प्रदेशात फिरलो.
राइडिंग आपल्याला संयम, शांत आणि संघर्ष करायला शिकवते. कोणत्याही अडचणींचा सामना करण्यासाठी तयार करते. सर्वात महत्वाचं स्वतःचा शोध घ्यायला लावले. - संकेत जाधव, बाईक रायडर, पुणे तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.