नवी दिल्ली, 20 एप्रिल : झटपट पैसा कुणाला नको असतो. पण याचाच फायदा अनेक लोक फसवणूक करण्यासाठी घेतात. असाच एक मेसेज सध्या व्हॉट्सवर व्हायरल होतो आहे. भारतातल्या काही निवडक व्हॉट्सअॅप युजर्सना ‘कौन बनेगा करोडपती’च्या (KBC) नावाखाली फसवणूक करणारे मेसेजेस येत आहेत. केबीसी सिमकार्ड लकी ड्रॉबाबतचे हे मेसेज आहेत. तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर याला बळी पडू नका (Whatsapp fraud in the name of kbc lucky draw). सध्या व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये एक व्हिडीओ आहे. ज्याच्या पोस्टरमध्ये तुम्ही केबीसी लकी ड्रॉ चा उल्लेख केला आहे. तुम्ही 25 लाख रुपयांचं बक्षीस जिंकल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच पोस्टरवर केबीसी होस्ट अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेता शाहरूख खान आणि रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा फोटो दिसतो आहे. सोबतच केबीसी लकी ड्रॉ कोड, व्हॉट्सअॅप नंबर, काही स्टिकर्स आणि स्पॉन्सर्स टॅगही आहेत. जेणेकरून हा मेसेज फेक नाही, असं सर्वांना वाटेल. या व्हिडीओत तुम्हाला 6261343146 या क्रमांकाशी संपर्क साधायला सांगितलं जातं. तुम्ही या नंबरवर सामान्य कॉल करू शकत नाही. तुम्हाला व्हॉट्सअॅप कॉल करावा लागेल असं म्हटलं आहे. त्यानंतर राणा प्रताब नावाचा अधिकारी तुमच्याकडून वैयक्तिक माहिती घेईल असंही सांगण्यात आलं आहे. व्हॉट्सअॅपवर केबीसीसंबंधित असा मेसेज येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीसुद्धा असे मेसेज व्हायरल झाले होते. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार, असे मेसेज अनोळख्या क्रमांकावरून येतात. त्यापैकी बहुतेक क्रमांक हे +92 ने सुरू होतात. हा पाकिस्तानचा आयएसडी कोड आहे. हे वाचा - ‘26 एप्रिलला माझं लग्न आहे, मला पळवून घेऊन जा’; 10 रुपयांच्या नोटेवर BF साठी GF चा मेसेज VIRAL या आकर्षक मेसेजला बळी पडून रिप्लाय देताच पुढे जे काही सांगितलं जाईल, तसं करतात. सुरुवातीला काही पैसे भरायला सांगितलं जातं. तसंच एकेक मागण्या वाढत जातात आणि संपर्कासाठी केवळ व्हॉट्सअॅपच वापरण्याचा आग्रह पलीकडच्या बाजूकडून धरला जातो. त्यांना वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे भरण्यास सांगितलं जातं. तसंच, बक्षिसाची रक्कम 45 लाख, 75 लाख वगैरे अशी वाढल्याचं सांगितलं जातं. युजर्सचा त्यावर विश्वास बसतो आणि ते थोडेथोडे पैसे भरत राहतात. असं काही आठवडे किंवा काही महिन्यांपर्यंत चालू शकतं. नंतर जेव्हा युजर्सना फसवणुकीची शंका येते, तेव्हा ते आधी बक्षिसाची रक्कम देण्यास सांगतात आणि तोपर्यंत पुढची रक्कम भरणार नसल्याचं सांगतात. त्यानंतर समोरच्या बाजूकडून संपर्क तोडला जातो आणि यासाठी वापरलेले व्हॉट्सअॅप नंबर्स बंद केले जातात, अशी माहिती दिल्ली सायबर पोलिसांनी दिली आहे. हे वाचा - तुमच्या आधार कार्डचा मोबाईल सिमसाठी गैरवापर होतोय का? आधारशी लिंक सर्व फोन नंबर घरबसल्या तपासा अशा प्रकारचे रोख बक्षीस देण्याचा दावा करणारे मेसेजेस खोटे असतात. तसंच, त्यात व्याकरणदृष्ट्या बऱ्याच चुका असतात. त्यावरून हे मेसेजेस खोटे आहेत हे ओळखता येऊ शकतं. त्यामुळे युजर्सनी अशा अफवांना बळी पडू नये. अशा प्रकारच्या कोणत्याही संवादात जर वैयक्तिक माहिती खुली करण्याचा आग्रह केला जात असेल, तर सावध व्हावं. युजर्सना असा काही मेसेज आला, तर स्क्रीनशॉट काढून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.