नवी दिल्ली, 12 जुलै: मागील वर्षी सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग आणि त्यानंतर अपरिहार्यपणे करावं लागलेलं लॉकडाउन यामुळे सर्वांत मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बुडाले, छोट्या छोट्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आणि लोक कर्जबाजारी झाले. तरीही गेल्या काही महिन्यांपासून परिस्थिती पुन्हा थोडीथोडी सुधारू लागली आहे. अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेतच. शिवाय आता अनेक कंपन्यांचं कामकाजही सुरळीत होऊ लागलं आहे. काही सरकारी संस्था आणि खासगी कंपन्यांमध्येही भरती होऊ लागली आहे. आयआयएम (Indian Institute of Management) आणि आयआयटी (Indian Institute of Technology) यांसारख्या संस्थांमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांची जगभरातल्या दिग्गज कंपन्यांकडून या संस्थांतल्या विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमधून (Campus Interview) निवड केली जात असते. शिवाय कोट्यवधी रुपयांचं पॅकेजही देत असतात. कोरोना कालखंडातही यात काही काळाचा अपवाद वगळता फारसा खंड पडलेला नाही. अलीकडेच आयआयटीमध्ये अंतिम वर्षात शिकत असलेल्या 10 विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्ट (Microsoft) या दिग्गज कंपनीने वार्षिक 45.3 लाख रुपये पॅकेजची नोकरी दिली आहे. यश बाफना (इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग), आस्था अग्रवाल (सीएसई), सौरव चौधरी (सीएसई), अंकेश राज (सीएसई), नेहा मोडक (सीएसई), अंश बाफना (सीएसई), अभिलाष सेनापती (सीएसई), अभिषेक जैन (सीएसई), निहारिक रावत (एन्व्हायर्न्मेंट), शिप्रा वर्मा (एन्व्हायर्न्मेंट) अशी मायक्रोसॉफ्टने निवडलेल्या 10 विद्यार्थ्यांची नावं असल्याचं वृत्त ‘लाइव्ह हिंदुस्थान डॉट कॉम’ने दिलं आहे. ( Job Alert: प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूर इथे नोकरीची सुवर्णसंधी ) मायक्रोसॉफ्टसह नूटानिक्स, एसआरआय दिल्ली, एक्स्पीडिया, अॅसेंचर, सीएसआरएल (CSRL) या कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. आयआयटीमध्ये आतापर्यंत 700 हून अधिक विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरी मिळाली आहे. कोरोनाचा कालखंड असूनही सलग दुसऱ्या वर्षीही आयआयटीच्या कॅम्पस प्लेसमेंटची स्थिती चांगली आहे. नूटानिक्स, सीएसआरएल आणि अॅसेंचर (Accenture) कंपन्यांनी प्रत्येकी एका, एसआरआय दिल्ली या कंपनीने दोघांना, तर अॅसेंचर कंपनीने पाच जणांना नोकरीसाठी निवडलं आणि मोठं पॅकेज दिलं. ( आता गणिताचं नो टेन्शन! बारावीनंतर करिअर करण्यासाठी ‘हे’ आहेत टॉप कोर्सेस ) त्याशिवाय लंडनच्या ब्लूमबर्ग (Bloomberg) कंपनीने तब्बल 90 लाख रुपये आणि 81 लाख रुपये असं भरभक्कम वार्षिक पॅकेज देऊन दोघांची यंदा निवड केली. आयआयटी धनबादमध्ये कम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग ड्युएल डिग्रीचं शिक्षण घेणाऱ्या बानीप्रीतला 90 लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज मिळालं. आयआयटी धनबादमधल्या (IIT Dhanbad) विद्यार्थ्याला आतापर्यंत मिळालेलं हे सर्वाधिक रकमेचं पॅकेज आहे. याच शाखेत शिक्षण घेणाऱ्या अभिनव वाजपेयी या विद्यार्थ्याला 81 लाख रुपयांचं पॅकेज मिळालं आहे. दरम्यान, याच वर्षी एप्रिल महिन्यात आयआयटी धनबादमधल्या तीन विद्यार्थ्यांना गुगलने (Google) निवडलं होतं. इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग शाखेत शिकणारे यश रांका आणि अंशुमन चौधरी, तसंच कम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग शाखेत शिकणारा सुतीर्थ पॉल यांना प्रत्येकी 44 लाख रुपये वार्षिक पॅकेज देऊन गुगल कंपनीने निवडलं होतं.