शुभमन गिलच्या कॅचवरून वाद
लंडन, 11 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये चौथ्या दिवशी शुभमन गिलला थर्ड अंपायरनी बाद दिल्याचा वाद सध्या रंगला आहे. शुभमन गिलचा झेल कॅमेरून ग्रीनने घेतला. पण चेंडू मैदानावर टेकल्याचं म्हटलं जात आहे. गिलने डीआरएस घेतल्यानंतर रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत नव्हते तरी मैदानी पंचांचा निर्णय कायम ठेवत गिलला बाद ठरवण्यात आले. दरम्यान, यावर शुभमन गिलने सोशल मीडियावर पोस्ट करून दिलेल्या प्रतिक्रियेमुळे त्याच्या अडचणीत भर पडू शकते. त्याने पंचांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. गिलने केलेल्या या पोस्टमुळे त्याच्यावर आयसीसीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते. त्याच्यावर काय कारवाई होणार हे आता आयसीसी कशा पद्धतीने दखल घेते त्यावर अवलंबून आहे. शुभमन गिलने सामन्यानंतर त्याच्या झेलबादच्या निर्णयाविरुद्ध ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. शुभमन गिलने कॅमेरून ग्रीन झेल घेत असलेला फोटो शेअर केला आहे. त्यात कॅप्शनमध्ये दोन भिंगाच्या काचांचे इमोजी आणि डोक्यावर हात मारलेला इमोजी टाकला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर टाळ्या वाजवत असलेले इमोजी पोस्ट केले आहेत.
खेळत राहा, शाब्बास! ओव्हलवर मराठमोळा संवाद, रहाणेने शार्दुलला मायबोलीतून दिल्या टिप्स
भारताला ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 444 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा मैदानात उतरले. भारताची सुरुवात चांगली झाली होती. मात्र गिल क१८ धावांवर असताना बोलँडच्या चेंडूवर स्लिपमध्ये कॅमेरून ग्रीनने चेंडू झेलला. ग्रीनने यानंतर जोरदार जल्लोष केला. तर गिल जागेवरच उभा होता. ऑन फिल्ड अंपायरने सॉफ्ट सिग्नल न देता तिसऱ्या पंचांची मदत घेतली. नुकतंच आयसीसीने सॉफ्ट सिग्नलचा नियम रद्द केला आहे. पहिल्यांदाच ऑन फिल्ड अंपायरने थर्ड अंपायरची अशी थेट मदत घेतली. टीव्ही रिप्लेमध्ये बराच वेळ वेगवेगळ्या बाजूंनी पाहिल्यानंतर पंचांनी गिलला झेलबाद दिलं. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनाही पंचांच्या निर्णयाने धक्का बसला. ग्रीनने घेतलेला झेल क्लीन होता की नव्हता हे स्पष्ट होत नव्हतं, तसंच काही अँगलने पाहताना चेंडू मैदानाला लागल्यासारखं दिसत होतं. तरीही गिलला बाद दिल्यानं चाहत्यांनी चीटर चीटर असं म्हणत ग्रीनला सामन्यावेळी डिवचलं.