सिराजने केली लॅब्युशेनची झोपमोड
लंडन, 10 जून : कसोटी क्रिकेटमध्ये अनेकदा संथगतीने सुरू असलेल्या खेळात नाट्यमय घडामोडी घडतात. सामन्यात काही घडत नसेल तर कंटाळलेले चाहते झोपल्याचं अनेकदा दिसतं. पण जर खेळाडूच ड्रेसिंग रूमबाहेर खुर्चीत झोपला असेल तर? WTC फायनलच्या तिसऱ्या दिवशी असंच काहीसं झालं. मार्नस लॅब्युशेन फलंदाजीला मैदानात येण्याआधी ड्रेसिंग रुमबाहेर खुर्चीत झोपला होता. पण डेव्हिड वॉर्नर जेव्हा बाद झाला तेव्हा त्याला यानंतर आपणच खेळायला जाणार असल्याची जाणीव झाली. यानंतर तो घाई घाईतच खुर्चीतून उठल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं. ऑस्ट्रेलियाने ओव्हलवर तिसऱ्या दिवशी भारतीय संघाला 296 धावांवर ऑलआऊट केलं. यानंतर कांगारुंनी दुसऱ्या डावाची सुरूवात केली. सुरुवातीला डेव्हिड वॉर्नर स्वस्तात बाद झाला. त्याच्यानंतर लॅब्युशेनला फलंदाजीला यायचं होतं. पण तो ड्रेसिंग रूममध्ये खुर्चीत झोपला होता. वॉर्नर बाद होण्याआधी लॅब्युशेनने डोळे झाकलेले होते. इकडे मैदानात वॉर्नर बाद झाला आणि लॅब्युशेनची झोप उडाली. मोहम्मद सिराजने वॉर्नरला बाद केलं. WTC Final : कांगारुंची फजिती, भारत ऑलआऊट होण्याआधीच सोडलं होतं मैदान; पाहा काय घडलं
वॉर्नर बाद झाल्यानतंर मैदानात झालेल्या जल्लोषाने लॅब्युशेनची झोप उडावली. त्याला वॉर्नर बाद झाल्याचं आणि आपल्याला फलंदाजीला जायचंय याची जाणीव झाली. त्यावेळी थोडीशी झोपही लॅब्युशेनच्या चेहऱ्यावर दिसत होती. खुर्चीतून उठला आणि तयार होऊन मैदानात पोहोचला. खेळपट्टीवर दुसऱ्याच चेंडूवर मोहम्मद सिराजचा चेंडू लॅब्युशेनच्या ग्लोव्हजला लागला. यामुळे हातातून बॅट सुटून ती खाली पडली. असं एकदा नव्हे तर दोनदा घडलं. यानंतर लॅब्युशेनने संयमाने खेळी करत तिसऱ्या दिवसअखेर नाबाद 41 धावा केल्या. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने कसोटीवर पकड मजबूत केलीय. भारताकडून अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांनी अर्धशतके केल्याने डाव सावरला. अजिंक्य रहाणेने 89 तर शार्दुलने 51 धावा केल्या. दोघांनी सहाव्या गड्यासाठी महत्त्वाची अशी शतकी भागिदारी केली. रहाणे बाद झाल्यानंतर भारताचा डाव गडगडला.