south australia
सिडनी, 26 फेब्रुवारी : टी२० क्रिकेटमध्ये चौकार षटकार जास्त बघायला मिळतात. त्यामुळे एखाद्या संघाला एकदिवसीय सामन्यात शेवटच्या ६ चेंडूत ४ धावा करायच्या असतील आणि ५ विकेट हातात असतील तर त्या संघाचा विजय सहज होईल असं मानलं जातं. पण ऑस्ट्रेलियात देशांतर्ग लीस्ट ए स्पर्धेत रोमहर्षक असा अंतिम सामना बघायला मिळाला. दक्षिण ऑस्ट्रेलियाला अखेरच्या षटकात ४ धावा करायच्या होत्या. पण त्यांनी ६ चेंडूत ५ विकेट गमावल्या. यामुळे टास्मानियाच्या महिला संघाने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे सामना एका धावेने जिंकला. टास्मानियाने सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारून पुन्हा विजेतेपद पटकावलंय. दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या डावातील ४७ वे षटक वेगवान गोलंदाज साराह कोयटेने टाकलं. पहिल्या चेंडूवर एनी ओ नील बोल्ड झाली. तर दुसऱ्या चेंडूवर एक धाव निघाली. तिसऱ्या चेंडूवर जिमी बेर्सी यष्टीचित झाली. चौथ्या चेंडूवर अमांडा धावबाद झाली. या चार चेंडूत एक धाव आणि तीन बॅटर बाद झाले होते. शेवटी २ चेंडूत ३ धावा हव्या होत्या. तेव्हा पाचव्या चेंडूवर एला विल्सन पायचित झाली आणि दक्षिण ऑस्ट्रेलियाला नववा धक्का बसला. VIDEO : असं कोण आऊट होतं? पुढे जाऊन खेळण्याच्या नादात पाय घसरला, मागे पाहिलं तर..
दक्षिण ऑस्ट्रेलियाला स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्यासाठी अखेरच्या चेंडूवर ३ धावांची गरज होती. मात्र एलिसु मुस्वांगाने फक्त एकच धाव घेतली, त्यानंतर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात ती धावबाद झाली. संपूर्ण संघ २४१ धावातच बाद झाला आणि टास्मानियाने एका धावेने सामना जिंकला. टास्मानियाने प्रथम फलंदाजी करताना 264 धावा केल्या होत्या. कर्णधार एलिस विलानीने ११० तर नाओमी स्टेलेनबर्गने ७५ धावा केल्या. पावसामुळे या सामन्यात दक्षिण ऑस्ट्रेलियाला ४७ षटकात २४३ धावांचे आव्हान मिळाले होते. दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून कर्टने वेबने ८३ तर एमाने ६८ धावा केल्या. ३० धावा देत ४ विकेट घेणाऱ्या साराह कोयटेला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. तिने दोन झेलही घेतले.