मुंबई, 8 मार्च : भारतीय महिला क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठे बदल झाले आहेत. महिलांची आयपीएल स्पर्धा काही दिवसांपूर्वी सुरु झालीय. पाच टीममध्ये सुरु असलेल्या पहिल्या सिझनला फॅन्सकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. या स्पर्धेच्या पाठोपाठ आता मुंबई क्रिकेट असोसिएशननंही महिला क्रिकेटसाठी खास स्पर्धेचं आयोजन केलं आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशी ही स्पर्धा सुरू झालीय. काय आहे स्पर्धा? मुंबई क्रिकेट असोसिएशननं आंतरक्लब महिला क्रिकेट लीगचं आयोजन केलंय. या स्पर्धेत एकूण 52 क्लब सहभागी होणार असून 780 खेळाडूंना संधी मिळणार आहे. मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लब विरुद्ध फोर्ट यंगस्टर्स यामध्ये उद्घाटनाचा सामना होईल. विशेष म्हणजे हा सामना महिला अंपायर आणि महिला स्कोर राईटर यांच्या नियंत्रणाखाली होईल. WPLमध्ये सर्वात महाग ठरलेल्या स्मृतीचा कसा आहे संघर्षमय प्रवास? जाणून घ्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 52 टीमना 13 गटाममध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटातील एक विजेता बाद फेरीत प्रवेश करेल. वरोज क्रिकेट क्लब वि. पी.जे. हिंदू जिमखाना, स्पोर्ट्स प्रमोशन ग्रुप मुंबई वि. पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन, आवर्स क्रिकेट क्लब वि. दिलीप वेंगसरकर फौंडेशन, नॅशनल क्रिकेट क्लब वि. स्पोर्टिंग युनियन क्लब, राजावाडी क्रिकेट क्लब वि. प्रभू जॉली यंग क्रिकेटर्स, पय्याडे स्पोर्ट्स क्लब वि. माटुंगा जिमखाना, स्पोर्टिंग क्लब कमिटी ठाणे वि. दादर पारसी कॉलनी स्पोर्टिंग क्लब, ग्लोरिअस क्रिकेट क्लब वि. डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी, एम.आय.जी. क्रिकेट क्लब वि. वरळी स्पोर्ट्स क्लब, मुंबई पोलीस जिमखाना वि. जे. भाटीया स्पोर्ट्स क्लब या टीम या प्रमुख टीम या स्पर्धेत सहभागी होणार असून मुंबईतील 13 पिचवर हे सामने खेळवले जातील. WPL 2023 : वडील शेतकरी, आई गृहिणी; सोलापूरच्या लेकीने गुजरातविरुद्ध झळकावलं अर्धशतक मुंबईतील क्रिकेटचे स्वरुप हे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपासूनच क्रिकेटर्स घडण्यात मुंबईत सुरूवात होते. मुंबईनं अनेक दिग्गज क्रिकेटपटू जगाला दिले आहेत. त्यांच्या जडणघडणीत या यंत्रणेचा मोठा वाटा आहे. महिला क्रिकेटपटूंनाही या प्रकारची संधी मिळावी आणि नव्या खेळाडू देशाला मिळाव्यात यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.