मुंबई, 12 जानेवारी : आपल्या जबाबदारीवर गाडी पार्क करा, असा बोर्ड आपण अनेक ठिकाणी पाहत असतो. पण असं कमी वेळाच होतं जेव्हा रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीवर येऊन बॉल आपटतो. वेस्ट इंडिज आणि आयर्लंड (West Indies vs Ireland) यांच्यातल्या जमैकामध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्ये असंच काहीसं झालं. आपली पहिलीच वनडे खेळणाऱ्या ओडिन स्मिथनेने (Odean Smith) मारलेला सिक्स स्टेडियमबाहेर उभ्या असलेल्या रेंज रोव्हर कारवर जाऊन आदळला. कारच्या मालकाला नेमकं काय झालं हे समजण्याआधीच या महागड्या कारला पोचा आला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ओडिनने मारलेला शॉट थेट स्टेडियमबाहेर गेला आणि निळ्या रंगाच्या रेंज रोव्हर कारवर जाऊन आदळल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. कॉमेंटेटरही ओडिन स्मिथचा हा शॉट पाहून हैराण झाले. थोड्या वेळानंतर ही कार वेस्ट इंडिजचाच खेळाडू शेल्डन कॉट्रेलची (Sheldon Cotrell) आहे, ही माहिती समोर आली.
ओडिन स्मिथने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमधून पदार्पण केलं, तो 9व्या क्रमांकावर बॅटिंगला आला, तेव्हा इनिंगची 47 वी ओव्हर सुरू होती. त्याने अजिबात वेळ न घालवता आक्रमक बॅटिंग करायला सुरूवात केली. 48 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला स्मिथने एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सिक्स मारली. हा बॉल थेट कारवरच जाऊन आदळला. यानंतर त्याने 49 व्या ओव्हरच्या लागोपाठ 2 बॉलवर एक सिक्स आणि एक फोर मारली. पण पुढच्याच बॉलवर तो मोठा शॉट मारण्याच्या नादात आऊट झाला. ओडिनने 8 बॉलमध्ये 18 रनची खेळी केली, ज्यामुळे वेस्ट इंडिजने 48.5 ओव्हरमध्ये 269 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा 49.1 ओव्हरमध्ये 245 रनवर ऑल आऊट झाला, ज्यामुळे वेस्ट इंडिजने पहिली वनडे 24 रनने जिंकली. ओडिनने आपल्या बॉलिंगनेही मॅचमध्ये छाप पाडली. त्याने 5.1 ओव्हरमध्ये 26 रन देऊन 2 विकेट मिळवल्या. ओडिनने 2018 सालीच वेस्ट इंडिजसाठी टी-20 मध्ये पदार्पण केलं होतं, पण पहिली वनडे खेळायला त्याला 3 वर्षांचा वेळ लागला. दोन्ही देशांमध्ये दुसरी वनडे 11 जानेवारीला होणार होती, पण आयर्लंडच्या टीममध्ये कोरोनाने शिरकाव केल्यामुळे वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. आता दुसरी वनडे 13 जानेवारी आणि तिसरी वनडे 16 जानेवारीला होणार आहे, तर एकमेव टी-20 मॅच रद्द करण्यात आली आहे.