भारताविरुद्ध दमदार फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांना विराट कोहलीकडून खास गिफ्ट
मुंबई, 14 मार्च : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटीचा शेवटचा सामना पारपडला. या सामन्यात भारतासह ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करून संघाला चांगली आघाडी मिळवून दिली. हा शेवटचा सामना ड्रॉ झाला आणि 2-1 ने मालिकेत आघाडी मिळवत भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर चौथ्या सामन्यात भारताविरुद्ध जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना विराटने खास भेट दिली. अहमदाबाद येथील चौथ्या सामन्यात विराटने 185 धावा करून भारताचा डाव सावरला. या सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 75 वे शतक ठोकले. विराटच्या या परफॉर्मन्समुळे त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया संघातील फलंदाज उस्मान ख्वाजा आणि अॅलेक्स केरी या दोघांना आपल्या नावाची जर्सी भेट दिली. उस्मान ख्वाजाने चौथ्या कसोटीत भारताविरुद्ध 180 धावा केल्या होत्या.
बीसीसीआयने विराट कोहलीचा हा व्हिडिओ ट्विट केला असून यात प्रतिस्पर्ध्यांप्रती विराटची आदर भावना व्यक्त होते.