अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताने सेमीफायनलला पाकला धूळ चारत फायनलमध्ये धडक मारली आहे. या सामन्यात भारताच्या गोलंदाजीने कमाल केली तर सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांनी पाकच्या गोलंदाजीतली हवाच काढून घेतली.
पॉचेफस्ट्रूम, 04 फेब्रुवारी : अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या शतकाच्या आणि दिव्यांश सक्सेनाच्या अर्धशतकाच्या जोरावर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांनी पाकच्या गोलंदाजांना एकही संधी दिली नाही. दोघांनी सावधपणे खेळ करत भारताचा विजय साजरा केला. जयस्वालने नाबाद 105 तर दिव्यांशने नाबाद 59 धावा केल्या. तत्पूर्वी, पाकिस्तानने टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या संघाला 50 षटकेही खेळून काढता आली नाहीत. भारताच्या भेदक माऱ्यासमोर पाकचा संघ 43.1 षटकात 172 धावांपर्यंत मजल मारू शकला. रोहेल नझीर 62 धावा, हैदर अली 56 धावा आणि मोहम्मद हॅरीस 21 धावा वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. भारताच्या सुशांत मिश्राने 28 धावा देत सर्वाधिक तीन गडी बाद केले. त्यानंतर कार्तिक त्यागी आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन तर अंकोलेकर आणि जयस्वालने प्रत्येकी एक गडी बाद केला.
भारताने प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला 74 धावांनी पराभूत करून अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. तर पाकिस्तानने अफगाणिस्तानला पराभूत करून अंतिम चार जणांमध्ये स्थान पटकावलं आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 23 सामने झाले आहेत. यातील 14 भारताने तर 8 पाकिस्तानने जिंकले आहेत. एक सामना टाय झाला होता. सध्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा यशस्वी जयस्वाल फॉर्ममध्ये आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. तर गोलंदाजांमध्ये रवि बिश्नोई चौथ्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड कपमध्ये भारत पाक 9 वेळा आमने सामने आले आहेत. यात 4 वेळा पाकिस्तान तर 5 वेळा भारताने विजय मिळवला आहे. गेल्या तीन सामन्यात भारताने पाकिस्तानला लोळवलं आहे. पाकिस्तानच्या संघाने 23 जानेवारी 2010 मध्ये भारताला वर्ल्ड कपमध्ये पराभूत केलं होतं. आतापर्यंत भारताने वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका, जपान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. तर पाकिस्तानने स्कॉटलंड, झिम्बॉम्बे, अफगाणिस्तान यांना पराभूत केलं आहे. तर बांगलादेशविरुद्धच्या सामन्याचा निकाल लागला नाही. भारतीय U19 टीम: यशस्वी जयस्वाल, दिव्यांश सक्सेना, टिळक वर्मा, प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रुव जुरेल, सिद्धेश वीर, अर्थव अंकोलेकर, रवि बिश्नोई, सुशांत मिश्रां, कार्तिक त्यागी, आकाश सिंग. पाकिस्तान U19 टीम: हैदर अली, मोहम्मद हुरारा, रोहेल नजीर, फहद मुनीर, कासिम अकरम, मोहम्मद हैरिसव, इरफान खान, अब्बास अफरिदी, ताहिर हुसैन, आमिर अली, मोहम्मद आमिर खान, मोहम्मद वासिम ज्यूनिअर, अब्दुल बांगलजई, मोहम्मद शहजाद, आसिफ अली खान