मुंबई, 14 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे, पण चाहते भारत-पाकिस्तानमधल्या (India vs Pakistan) महामुकाबल्यासाठी आतूर झाले आहेत. या सामन्याआधी पाकिस्तानी टीमने माईंड गेम सुरू केले आहेत, दुसरीकडे भारत-पाकिस्तान मॅचआधी येणारी मौका-मौका (Mauka Mauka) ही जाहिरात पुन्हा एकदा नव्या रुपात आली आहे. पाकिस्तानला अजूनपर्यंत वर्ल्ड कपमध्ये कधीच भारताचा पराभव करता आला नाही. भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानमधून नेहमीच टीव्ही फोडल्याचे व्हिडिओ समोर येतात. मौका-मौका च्या या नव्या जाहिरातीमध्येही हेच दाखवण्यात आलं आहे. मौका-मौका जाहिरातीमध्ये नेहमी असणारा पाकिस्तानी चाहता यावेळीही आहे. यावेळी हा चाहता दुबईतल्या एका मॉलमध्ये रॉकेट आणि फटाके घेऊन टीव्ही विकत घेण्यासाठी जातो. मोठा टीव्ही दाखवा कारण यावेळी बाबर आणि रिझवान दुबईहून अशा सिक्स मारणार आहेत, दिल्लीतल्या लोकांच्या घराच्या काचा फुटणार आहेत, असं हा चाहता टीव्ही विक्रेत्याला सांगतो.
पाकिस्तानी चाहत्याचं हे वक्तव्य ऐकून टीव्ही विक्रेता त्याला दोन टीव्ही देतो. टी-20 मध्ये तुम्ही आमच्याविरुद्ध दोनवेळा हरले आहात. दोन टीव्ही घेऊन जा, ‘बाय वन-ब्रेक वन फ्री’मॅचनंतर एक टीव्ही फोडण्यासाठी वापरा, असं भारतीय दुकान विक्रेता त्याला म्हणतो. स्टार स्पोर्ट्सने ही जाहिरात त्यांच्या सोशल मीडियावर शेयर केली आहे. यानंतर हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत कधीच हरला नाही टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं पाकिस्तानविरुद्धचं रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमध्ये 5 मॅच झाल्या, यातल्या सगळ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला. 2007 साली ग्रुप स्टेज आणि फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. यानंतर 2012, 2014 आणि 2016 सालीही टीम इंडियाला विजय मिळाला. 2016 साली भारत-पाकिस्तान यांच्यात अखेरचा टी-20 वर्ल्ड कपचा सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने पहिले बॅटिंग करत 5 विकेट गमावून 118 रन केले होते, भारताने हा सामना 4 विकेट गमावून जिंकला होता.