दुबई, 25 ऑक्टोबर : टीम इंडियाची टी-20 वर्ल्ड कपची (T20 World Cup) सुरुवातच धक्कादायक पराभवाने झाली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा (India vs Pakistan) तब्बल 10 विकेटने पराभव झाला आहे. भारताने ठेवलेलं 152 रनचं आव्हान पाकिस्तानने 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. बाबर आझमने (Babar Azam) 51 बॉलमध्ये नाबाद 66 रन आणि मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) 55 बॉलमध्ये नाबाद 79 रन केले. टीम इंडियाचा टी-20 मधला 10 विकेटने झालेला हा पहिलाच पराभव आहे, तर पाकिस्तानने पहिल्यांदाच टी-20 सामना 10 विकेटने जिंकला. या मॅचनंतर झालेल्या पत्रकार परिषेदत पाकिस्तानी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नामुळे विराट कोहलीलाही (Virat Kohli) धक्का बसला. ‘इशान किशन फॉर्ममध्ये असतानाही त्याच्याऐवजी रोहित शर्माला टीममध्ये संधी देण्यात आली. टीमने निवड करताना चूक केली का?’ असा सवाल या पाकिस्तानी पत्रकाराने विचारला. पत्रकाराचा हा प्रश्न ऐकून विराटही चक्रावला. रोहित शर्माला टीममधून काढावं, असं तुम्हाला वाटतं का? असा उलट प्रश्नच विराटने या पत्रकाराला विचारला. तुम्हाला वादच निर्माण करायचे असतील तर आधीच सांगा, असा टोलाही विराटने लगावला.
इशान किशनने दोन्ही सराव सामन्यांमध्ये धमाकेदार कामगिरी केली होती, पण या सामन्यात विराटने त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादववर विश्वास टाकला. सूर्यकुमार यादवने मात्र निराशाजनक कामगिरी केली. 8 बॉलमध्ये 11 रन करून सूर्या आऊट झाला. तर रोहित शर्माला या सामन्यात खातंही उघडता आलं नाही. शाहिन आफ्रिदीने रोहितला पहिल्याच बॉलला आऊट केलं. टी-20 वर्ल्ड कपमधला भारताचा पुढचा सामना रविवारी न्यूझीलंडविरुद्ध आहे. भारताच्या ग्रुपमध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाच्या टीम आहेत. या ग्रुपमधल्या टॉप-2 टीम सेमी फायनलसाठी क्वालिफाय होणार आहेत.