दुबई, 25 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाला (India vs Pakistan) जोरदार धक्का दिला आहे. भारताने दिलेलं 152 रनचं आव्हान पाकिस्तानने 17.5 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर आझमने (Babar Azam) 51 बॉलमध्ये नाबाद 66 रन आणि मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) 55 बॉलमध्ये नाबाद 79 रन केले. या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला असला तरी कर्णधार विराट कोहलीने भारतीयच नाही तर पाकिस्तानी चाहत्यांचीही मनं जिंकली. मॅच संपल्यानंतर विराट कोहलीने पाकिस्तानचा ओपनर मोहम्मद रिझवानला मिठी मारली, तसंच त्याने बाबर आझमसोबतही गप्पा मारल्या. विराट कोहलीच्या या कृतीचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पाकिस्तानी चाहत्यांनीही विराट कोहलीच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक केलं आहे.
वर्ल्ड कप इतिहासातला पाकिस्तानचा भारताविरुद्धचा हा पहिलाच विजय आहे. याआधी झालेल्या पाचही टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती. वनडे वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तानला भारताला हरवणं जमलेलं नाही. वनडे वर्ल्ड कपच्या सगळ्या 7 सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यानंतर आता टीम इंडियाचा पुढचा सामना रविवार 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. भारताच्या ग्रुपमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडसह अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंडच्या टीम आहेत. ग्रुपमधल्या टॉप-2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवतील.