दुबई, 14 नोव्हेंबर : क्रिकेटच्या सामन्यात सोडलेला कॅच किती महागात पडू शकतो, हे टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सेमी फायनलमध्ये पुन्हा एकदा दिसून आलं. पाकिस्तानच्या हसन अलीने (Hasan Ali Drop Catch) मॅथ्यू वेडचा (Mathew Wade) बाऊंड्री लाईनवर कॅच सोडला, यानंतर मॅथ्यू वेडने पुढच्या तीन बॉलमध्ये मॅच संपवली आणि पाकिस्तानचं टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं, तसंच ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये प्रवेश मिळवला. टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup Final) असाच प्रकार घडला. विकेट मिळत नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा (Australia vs New Zealand) कर्णधार एरॉन फिंचने मिचेल स्टार्कला (Mitchell Starc) बॉलिंग दिली. 11 व्या ओव्हरचा चौथा बॉल फूल टॉस होता, त्यामुळे केन विलियमसनने (Kane Williamson) लेग साईडला सिक्स मारण्याचा प्रयत्न केला, पण जॉश हेजलवूडने विलियमसनचा कॅच सोडला आणि बॉल फोरच्या दिशेने गेला. कॅच सोडला तेव्हा विलियमसन 21 बॉलमध्ये 21 रनवर खेळत होता. केन विलियमसनने 48 बॉलमध्ये 85 रनची खेळी केली. विलियमसनच्या या खेळीमध्ये 10 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. विलियमसनच्या या आक्रमक बॅटिंगमुळे न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 173 रनचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये तब्बल 60 रन दिले. आता विलियमसनचा हा सोडलेला कॅच किती महागात पडणार, हे काही वेळेतच स्पष्ट होईल.
टी-20 वर्ल्ड कपची दुसरी सेमी फायनल पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला शेवटच्या दोन ओव्हरमध्ये विजयासाठी 22 रनची गरज होती, तेव्हा शाहिन आफ्रिदीच्या बॉलिंगवर हसन अलीनेही असाच कॅच सोडला होता आणि बॉल बाऊंड्री लाईनच्या बाहेर गेला. यानंतर पुढच्या तीन बॉलला तीन सिक्स मारत मॅथ्यू वेडने ऑस्ट्रेलियाला जिंकवून दिलं. त्याआधी सुपर-12 च्या पाचही मॅचमध्ये पाकिस्तानचा विजय झाला होता.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या टीम वर्ल्ड कप सुरू व्हायच्या आधी विजयाच्या प्रबळ दावेदार नव्हत्या, पण दोघांनी धमाकेदार कामगिरी करत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. या दोन्ही टीमना अजूनपर्यंत एकदाही टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. गेल्या काही वर्षांमध्ये न्यूझीलंडची कामगिरी कमालीची सुधारली आहे. न्यूझीलंडची टीम 2015 आणि 2019 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचली, पण दोन्ही वेळा त्यांच्या पदरी निराशा आली. यानंतर 2021 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये केन विलियमसनच्या टीमने भारताचा पराभव केला.