मुंबई, 14 नोव्हेंबर : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपची फायनल (T20 World Cup Final) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यात होणार आहे. दोन्ही टीम आपला पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याच्या प्रतिक्षेत आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विजयाच्या दावेदार टीम नव्हत्या, पण दोन्ही टीमनी आपल्या कामगिरीने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलमध्ये पाकिस्तानचा तर न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला. या दोन्ही सेमी फायनल अत्यंत रोमांचक झाल्या. पुढच्या काही तासांमध्ये जगाला नवा टी-20 चॅम्पियन मिळणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी फायनलमध्ये कोणती टीम विजयी होणार, याबाबत भविष्यवाणी केली आहे. शारजाहमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना गांगुलीने टी-20 वर्ल्ड कप न्यूझीलंड जिंकेल, असं भाकीत केलं. ‘मला वाटतं खेळाच्या जगात आता न्यूझीलंडची वेळ आहे. ऑस्ट्रेलिया एक महान देश आहे, पण त्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया जास्त चांगली आहे, पण न्यूझीलंडकडे जास्त हिंमत आणि योग्यता आहे, जी टीव्हीवर दिसते. त्यांनी काही महिन्यांपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये विजय मिळवला. तो खूप छोटा देश आहे, पण त्यांच्याकडे टॅलेंट खूप जास्त आहे. मला वाटतं आता वेळ न्यूझीलंडची आहे,’ असं वक्तव्य गांगुलीने केलं. सौरव गांगुलीने टी-20 वर्ल्ड कपमधल्या टीम इंडियाच्या (Team India) कामगिरीवरही भाष्य केलं. ‘विराटच्या नेतृत्वात खेळलेली टीम काही खराब मॅचमुळे बाहेर झाली. पण भारत येत्या सीरिजमध्ये जोरदार पुनरागमन करेल. लोकांच्या अपेक्षा खूप जास्त होत्या, पण निराशा हाती आल्यानंतरही त्यांनी निकाल स्वीकारला, याबाबत आनंदी आहे. लोकांना त्रास झाला, पण त्यांनी टोकाच्या प्रतिक्रिया दिल्या नाहीत,’ असं गांगुली म्हणाला. ‘शेवटी बुमराह, शमी, रोहित आणि कोहली सगळे माणसंच आहेत. ही गोष्ट फक्त दोन खराब मॅचची होती. त्या 40 ओव्हर खराब होत्या. टीम पुनरागमन करेल आणि एका वर्षात हीच मुलं ट्रॉफी उचलतील,’ असा विश्वास गांगुलीने व्यक्त केला. 2022 साली ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे.