सुनील गावस्कर
**मुंबई, 10 जुलै :**भारतीय क्रिकेटसाठी आत्तापर्यंत अनेक खेळाडूंनी आपलं योगदान दिलं आहे. मात्र, काही खेळाडू असे आहेत, ज्यांच्यामुळे भारतीय क्रिकेटला एक वेगळी ओळख मिळाली. अशा खेळाडूंमध्येच ‘लिटिल मास्टर’ सुनील गावस्कर यांचा समावेश होतो. भारताचे माजी कॅप्टन असलेल्या सुनील गावस्कर यांनी क्रिकेट जगतात अनेक विक्रम केले. टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार रनचा आणि 34 शतकांचा आकडा गाठणारे गावस्कर जगातील पहिले बॅट्समन होते. पाच फूट पाच इंच उंचीच्या गावसकरांच्या बालपणात एक घटना अशी घडली होती की ज्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य पालटून गेलं असतं. सुदैवानं त्यांच्या आयुष्यानं चांगलं वळण घेतलं आणि भारतीय क्रिकेटला एक उत्कृष्ट खेळाडू मिळाला. आज (10 जुलै) सुनील गावस्कर आपला वाढदिवस साजरा करत आहेत. ते 74 वर्षांचे झाले आहेत. त्या निमित्त त्यांच्या आयुष्यातील या खास प्रसंगाची ही आठवण. ‘आज तक’नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सुनील गावस्कर यांनी त्यांच्या ‘सनी डेज’ या आत्मचरित्रात सांगितलं आहे की, ‘जर माझ्या आयुष्यात तीक्ष्ण नजरेचे नारायण मसूरकर नसते तर मी कधीच क्रिकेटर झालो नसतो, ना हे पुस्तक लिहिलं गेलं असतं….’ आत्मचरित्रात गावसकरांनी लिहिलंय, “माझा जन्म झाला तेव्हा ते (ज्यांना मी नन-काका म्हणायचो) मला रुग्णालयात भेटायला आले होते. माझ्या कानावर त्यांना जन्मखूण दिसली. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा रुग्णालयात आले. पण, त्यांनी खेळवायला हातात घेतलेल्या मुलाच्या कानावर त्यांना पहिल्या दिवशी दिसलेली जन्मखूण दिसली नाही. यानंतर संपूर्ण रुग्णालयातील मुलांची तपासणी करण्यात आली. शेवटी बाळ असलेला मी एका मच्छिमाराच्या पत्नीजवळच्या पाळण्यात झोपलेला दिसलो. नर्सनं चुकून मला तिथे झोपवलं होतं. बाळांना आंघोळ घालताना कदाचित ही अदलाबदल झाली असावी. त्या दिवशी काकांनी लक्ष दिलं नसतं तर आज मी मच्छिमार झालो असतो.” गावस्कर यांच्या क्रिकेट कारकिर्दीला आकार देण्यामध्ये त्यांचे वडील मनोहर गावस्कर यांच्यासह आई मीनल यांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं. सुनील लहानपणी टेनिस बॉलनं खेळायचे आणि त्यांची आई त्यांच्यासाठी बॉलिंग करत असे. गावस्कर यांनी 1971 साली वेस्ट इंडिज दौऱ्यातून टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या डेब्यू सीरिजमध्ये, त्यांनी चार टेस्ट मॅचमध्ये 154.80 च्या सरासरीनं विक्रमी 774 रन (एक द्विशतक, चार शतकं आणि तीन अर्धशतकं) ठोकले होते. डेब्यू सिरिजमध्ये सर्वाधिक रन करण्याचा हा जागतिक विक्रम आजही टिकून आहे. गावस्कर यांनी टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंग्जमध्ये शतक झळकवण्याची कामगिरी तीन वेळा केली आहे. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय आहेत. 1971 मध्ये डेब्यू सीरिजमध्ये त्यांनी पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 124 आणि 220 रन्सची खेळी केली. यानंतर 1978 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कराची टेस्टमध्ये त्यांनी 111 आणि 137 रन्सची खेळी खेळली, जी आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. त्याच वर्षी, त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाता टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये शतकं (107 आणि 182 रन्स) झळकवली होती. गावस्करांचे इंटरनॅशनल रेकॉर्ड सुनील गावस्कर यांनी एकूण 125 टेस्ट मॅच खेळल्या. 16 वर्षांच्या (1971-1987) टेस्ट कारकिर्दीत त्यांनी 10 हजार 122 रन्स केले, ज्यात 34 शतकं आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे. गावस्कर यांचं टेस्टमधील बॅटिंग अॅव्हरेज 51.12 इतक होतं. त्यांचा 34 शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरने 2005 मध्ये मोडला होता. या शिवाय त्यांनी 108 वन-डेत 35.13 च्या सरासरीने 3092 रन्स केले. वन-डे क्रिकेटमध्ये त्यांनी फक्त एकच शतक झळकवलं आहे आणि तेही 107 व्या मॅचमध्ये. 1983 च्या वर्ल्डकप विजेत्या टीममध्ये गावस्कर यांचा समावेश होता. त्यांनी 47 टेस्ट आणि 37 वन-डेमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टेस्ट क्रिकेटमध्ये भारताने नऊ मॅच जिंकल्या आणि आठ गमावल्या, तर 30 मॅच ड्रॉ राहिल्या. वन-डे क्रिकेटमध्ये त्यांच्या नेतृत्त्वाखाली भारतानं 14 मॅचेस जिंकल्या तर 21 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आणि दोन ड्रॉ राहिल्या. डेब्यू टेस्ट सीरिजमध्ये सर्वाधिक रन्स करणारे खेळाडू : सुनील गावस्कर (भारत)- चार मॅच, 774 रन, 154.80 सरासरी, चार शतक जॉर्ज हॅडली (वेस्टइंडीज)- चार मॅच, 703 रन, 87.87 सरासरी, चार शतक कोनराड हंटे (वेस्टइंडीज)- पाच मॅच, 622 रन, 77.75 सरासरी, तीन शतक हर्बर्ट कॉलिन्स (ऑस्ट्रेलिया)- पाच मॅच, 557 रन, 61.88 सरासरी, दोन शतक बॅरी रिचर्ड्स (साउथ आफ्रिका)- चार मॅच, 508 रन, 72.57 सरासरी, दोन शतक 1971मध्ये वेस्टइंडीज दौऱ्यात गावस्करांची कामगिरी : पोर्ट ऑफ स्पेन टेस्ट- पहिली इनिंग 65 रन, दुसरी इनिंग 67* रन जॉर्जटाउन टेस्ट- पहिली इनिंग 116 रन, दुसरी इनिंग 64* रन ब्रिजटाउन टेस्ट- पहिली इनिंग 1 रन, दुसरी इनिंग 117 रन पोर्ट ऑफ स्पेन टेस्ट- पहिली इनिंग 124 रन, दुसरी इनिंग 220 रन.