मुंबई, 19 फेब्रुवारी : जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिकचे (Olympic) आयोजन भारतामध्ये करण्याच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे 2023 साली महत्त्वाचे सेशन मुंबईत होणार (IOC Session 2023) आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील या सेशनला ऑलिम्पिक समितीनं अधिकृत मान्यता दिली आहे. बीजिंगमध्ये झालेल्या ऑलिम्पिक समितीच्या परिषदेमध्ये मतदानानं हा निर्णय घेण्यात आला. एकूण 82 सदस्यांना या विषयावर मतदान करण्याचा अधिकार होता. यापैकी 75 सदस्यांनी भारताच्या बाजूनं मत दिलं. तर फक्त 1 मत भारताच्या विरोधात पडले. तर 6 सदस्यांनी यावेळी मतदान केले नाही. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सर्वोच्च संस्थेची सर्वसाधारण सभा (IOC Session) आता 2023 साली मुंबईमध्ये होणार आहे. जियो वर्ल्ड सेंटरमध्ये हे सेशन होईल. या महत्त्वाच्या परिषदेमध्ये भारतीय ऑलिम्पिक समितीचे नेतृत्त्व करणे हा बहुमान होता, अशी भावना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य (IOC) नीता अंबानी यांनी (Nita Ambani) व्यक्त केली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भारताने करावं हे आपल्या सर्वांचे स्वप्न असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांनीही हे महत्त्वाचे सत्र मुंबईत होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला असून त्यांनी ट्विट करत या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या नीता अंबानी यांचे आभार मानले आहेत.
भारतामध्ये 40 वर्षांनी ऑलिम्पिक समितीचे हे सेशन होत आहे. यापूर्वी 1983 साली नवी दिल्लीमध्ये हे सेशन झाले होते. पुढील वर्षी मे किंवा जून महिन्यात हे सेशन होण्याची शक्यता असून यामध्ये 2030 साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमान शहर निश्चित होणार आहे.