shoaib akhtar
मुंबई, 21 फेब्रुवारी : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर क्रिकेटच्या मैदानाशिवाय बाहेरही अनेक गोष्टींमुळे चर्चेत राहिला आहे. सध्या तो क्रिकेटच्या घडामोडींवरून अनेकदा टीका करताना दिसतो. इतर क्रिकेटपटूंसारखंच शोएब अख्तरला बॉलिवूडमध्ये रस होता. आता त्याने असा खुलासा केला आहे की, 18 वर्षांपूर्वी एका बॉलिवूड चित्रपटात प्रमुख भूमिका करण्याची ऑफर मिळाली होती. अख्तरने म्हटलं की, ‘मला बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या क्राइम ड्रामा असलेल्या गँगस्टर या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्यासाठी ऑफर मिळाली होती.’ गेल्या वर्षी अख्तरने त्याच्या बायोपिकच्या नावाचा खुलासा केला होता. रावळपिंडी एक्सप्रेस : रेसिंग अगेंस्ट द ऑड्स असं नाव अख्तरने जाहीर केलं होतं. दरम्यान, अद्याप या चित्रपटाची निर्मिती सुरू झालीय की नाही याची माहिती समोर आलेली नाही. गेल्या महिन्यात काही आरोप करत ट्विटरवरून या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. हेही वाचा : वानखेडेवर सुविधांची वानवा, वॉशरूम अस्वच्छ, पाणीही नाही; महिलेची BCCIकडे तक्रार सध्या शोएब अख्तरच्या नावाची चर्चा आणखी एका कारणासाठी आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डात गेल्या काही महिन्यात अनेक बदल झाले. यातच शोएब अख्तरने वक्तव्य केलं की, पीसीबी अध्यक्ष होण्याची माझी इच्छा आहे आणि पाकिस्तानसाठी सुपरस्टार तयार करायचे आहेत. माझ्या देशासाठी 50 सुपरस्टार बनवायचे आहेत. यानंतर सुपरस्टार 100, 200 ते 2000 पर्यंत पोहोचवायचे आहेत. शोएब अख्तरने 163 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहेत. तर 14 टी20 आणि 46 कसोटी सामन्यात त्यानं पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व केलं. त्याने कसोटीत 178, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 247 तर टी20 मध्ये 21 विकेट घेतल्या आहेत.