इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताचा (India vs England 4th Test) 157 रनने धमाकेदार विजय झाला. भारताच्या या विजयात पालघरच्या शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताचा (India vs England 4th Test) 157 रनने धमाकेदार विजय झाला. भारताच्या या विजयात पालघरच्या शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली, पण टीम इंडियामध्ये पोहोचण्याचा त्याचा प्रवास अत्यंत खडतर होता. मध्यमवर्गीय कुटुंबातल्या शार्दुलला रोज क्रिकेट खेळण्यासाठी पालघरहून मुंबईला ट्रेनने प्रवास करावा लागायचा.
शार्दुलने ओव्हल टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतकं केली. याचसह त्याने या मॅचमध्ये तीन विकेटही घेतल्या. टीम अडचणीत असताना शार्दुलने दोन्ही इनिंगमध्ये बॅटने महत्त्वाच्या खेळी केल्या.
शार्दुलला लहानपणापासूनच क्रिकेटपटू व्हायचं होतं, पण पालघरमध्ये चांगल्या सुविधा नसल्यामुळे त्याच्या कुटुंबाला बोईसरमध्ये यावं लागलं. बोरिवलीमध्ये शालेय क्रिकेट खेळताना शार्दुलला 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारण्यात आले. मुंबईकडून खेळण्यासाठी शार्दुलला कठोर मेहनत घ्यावी लागली, त्यानंतर त्याला रणजी टीममध्ये निवडण्यात आलं. शार्दुल रोज मुंबईच्या ट्रेनने प्रवास करायचा.
शार्दुलला 2 वर्षांपूर्वी आपल्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळल्यानंतर शार्दुलच्या पायाला दुखापत झाली. लंडनमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, यानंतर त्याने धमाक्यात पुनरागमन केलं.
शार्दुलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ब्रिस्बेन टेस्टमध्येही शानदार अर्धशतकी खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. मोठ्या मॅचमध्ये चांगली कामगिरी करून शार्दुलने भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिले.
टेस्ट टीममधून आपण जेव्हा बाहेर होतो तेव्हा एमएस धोनीने मदत केल्याचं शार्दुलने सांगितलं. दबावाचा सामना कसा करायचा? असं मी धोनीला विचारलं होतं, कारण त्याच्याकडे बराच आणि प्रत्येक प्रकारचा अनुभव आहे, अशी प्रतिक्रिया शार्दुलने दिली.
2013 साली त्याची मुंबईच्या रणजी टीममध्ये निवड झाली, पण वजन जास्त असल्यामुळे त्याच्यावर टीका करण्यात आली. यानंतर त्याने आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत केलं. सचिन तेंडुलकरची 10 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरल्यामुळे शार्दुलला ट्रोल करण्यात आलं होतं.
शार्दुलने 2017 साली श्रीलंकेविरुद्धच्या वनडेमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याला 2018 साली वेस्ट इंडिजविरुद्ध संधी मिळाली. हैदराबादमध्ये झालेल्या या टेस्टमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. त्याने आतापर्यंत 4 टेस्टमध्ये 14 विकेट घेतल्या, तर 15 वनडेत 22 आणि 22 आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 31 विकेट घेण्यात शार्दुलला यश आलं.