बंगालला नमवून सौराष्ट्राने रणजी ट्रॉफीवर कोरल नाव
मुंबई, 19 फेब्रुवारी : रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्राने बंगालवर 9 विकेट्सने मात करून रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर हा सामना खेळला गेला असून 4 वर्षात सौराष्ट्र संघाने दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. अंतिम सामन्यात बंगाल संघाने पहिल्या डावात 174 धावा केल्या. यात शहाबाझ अहमदने 69 तर अभिषेक पोरेलने 50 धावांची खेळी केली. तर प्रतिउत्तरात सौराष्ट्राने 404 धावा केल्या. यात सौराष्ट्रचे हार्वीक देसाई 50, शेल्डन जॅक्सन 59, अर्पित वसावडा 81 आणि चिराग जानी 60 धावा केल्या. परंतु दुसऱ्या डावात बंगालचा संघ केवळ 241 धावा करू शकला. त्यामुळे सौराष्ट्राला सामना जिंकण्यासाठी केवळ 14 धावांचे सोपे लक्ष्य मिळाले होते. हे ही वाचा : के एल राहुलचा फ्लॉप शो सुरूच! सोशल मीडियावर फॅन्स संतापले दुसऱ्या डावाला सुरुवात होताच सौराष्ट्रने 1 गडी गमावून 14 धावा केल्या आणि पुन्हा एकदा रणजी ट्रॉफीवर आपले नाव कोरले. सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटने अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने गोलंदाजी करताना तब्बल 9 बळी घेत आपल्या संघाला चॅम्पियन बनवले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. जयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्र संघ दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफी जिंकला आहे.