नवी दिल्ली, 26 जानेवारी : भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लोकप्रिय क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्स (Jonty Rhodes) आणि क्रिस गेल (Chris Gayle) यांना पत्र लिहिलं. जॉन्टी आणि गेल यांच्या भारताशी असलेल्या संबंधांचं मोदींनी कौतुक केलं. दक्षिण आफ्रिकेचा जॉन्टी ऱ्होड्स हा क्रिकेट जगताने पाहिलेला सर्वोत्तम फिल्डर आहे. तर वेस्ट इंडिजचा आक्रमक खेळाडू क्रिस गेलने टी-20 क्रिकेटमधले बॅटिंगचे सगळेच विक्रम स्वत:च्या नावावर केले आहेत. जॉन्टी ऱ्होड्सने तर स्वत:च्या मुलीचं नाव इंडिया ठेवलं आहे. गेलही त्याच्या बॅटिंगमुळे भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. जॉन्टीला लिहिलेल्या पत्रात मोदी म्हणाले, ‘मी आमच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला शुभेच्छा देतो. एवढ्या वर्षांपासून भारतीय संस्कृतीशी तुमचा संबंध आला आहे. तू मुलीचं नाव जेव्हा या महान देशाच्या नावावरून ठेवलंस तेव्हाच हे सिद्ध झालं. तू दोन्ही देशांच्या मजबूत संबंधांसाठी विशेष दूत आहेस.’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे पत्र जॉन्टी ऱ्होड्सने सोशल मीडियावर शेयर केलं आहे. या पत्राबाबत ऱ्होड्स आणि गेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद दिले आहेत. ‘तुमच्या या शब्दांसाठी धन्यवाद नरेंद्र मोदीजी. प्रत्येकवेळी भारतात येऊन मी माणूस म्हणून आणखी परिपक्व झालो. माझं पूर्ण कुटुंब भारतासोबत प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे. भारतीय नागरिकांच्या अधिकारांचं संरक्षण करणाऱ्या संविधानाचा सन्मान, जय हिंद,’ असं जॉन्टी ऱ्होड्स त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला.
दुसरीकडे क्रिस गेलनेही पंतप्रधान मोदींचं पत्र ट्वीट केलं आहे. ‘भारताला 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. सकाळी उठलो आणि पंतप्रधान मोदींचा संदेश मिळाला. या पत्रात त्यांनी माझ्या भारतीयांसोबत असलेल्या संबधांवर भाष्य केलं. युनिव्हर्सल बॉसकडून शुभेच्छा आणि प्रेम,’ असं गेल त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला.