चेन्नईकडून आयपीएल खेळलेल्या खेळाडूवर बस चालवायची वेळ
मुंबई, 20 जून : परिस्थिती कुणावर काय वेळ आणेल, सांगता येत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात, पण या पैशांचं नीट नियोजन केलं नाही तर काय होऊ शकतं? याचा प्रत्यय पुन्हा आला आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सुरज रणदीव रोजच्या जेवणासाठी ऑस्ट्रेलियामध्ये बस चालवत आहे. 38 वर्षांचा सुरज रणदीव आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळला आहे. ऑफ स्पिनर असलेल्या रणदीवने 2009 साली श्रीलंकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मुथय्या मुरलीधरनला रिप्लेस करून रणदीवने टीममध्ये स्थान मिळवलं होतं. एवढच नाही तर त्याने 2011 सालचा वर्ल्ड कपही खेळला. कामगिरीमध्ये सातत्य नसल्यामुळे रणदीव 2016 साली टीमबाहेर गेला, यानंतर त्याचं पुनरागमन झालं नाही. मैदानाबाहेर गेल्यानंतर रणदीव ऑस्ट्रेलियाला गेला. घराचा खर्च चालवण्यासाठी त्याने बस ड्रायव्हरची नोकरी सुरू केली. सुरज रणदीव हा सध्या ट्रान्सदेव नावाच्या कंपनीमध्ये काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. रणदीवशिवाय आणखी दोन क्रिकेटपटू या कंपनीमध्ये काम करत आहेत. झिम्बाब्वेचा वाडिंग्टन मवेन्गा आणि श्रीलंकेचाच चिंताका जयसिंघे हे दोघंही याच कंपनीत बस ड्रायव्हर आहेत. सुरज रणदीवने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये 50 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या, यातल्या 57 इनिंगमध्ये त्याला एकूण 86 विकेट मिळाल्या. रणदीवच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 43, वनडेमध्ये 36 आणि टी-20 मध्ये 7 विकेटचा समावेश आहे. याशिवाय 8 आयपीएल सामन्यांमध्ये त्याने 6 विकेट घेतल्या होत्या.