चिट्टगांग, 07 फेब्रुवारी: वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघ सध्या बांग्लादेशाच्या दौऱ्यावर (WI tour of BAN) आहे. वेस्ट इंडिजच्या संघात अनेक दिग्गज खेळाडूंची अनुपस्थित असताना पहिला कसोटी सामना (1st test match) अत्यंत चुरशीचा ठरला आहे. वेस्ट इंडिजने पहिल्याच सामन्यात यजमानांना धुळ चारत चारी मुंड्या चित केलं आहे. पहिल्या डावात या सामन्यावर बांग्लादेशची (Bangladesh) पकड मजबूत होती, पण वेस्ट इंडिजच्या (West indies) 28 वर्षीय कायल मेयर्सने (Kyle Mayers) धडाकेबाज कामगिरी करत बांग्लादेशाचा विजयाचा घास हिरावून नेला आहे. बांग्लादेशाने पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात उत्तम कामगिरी करत वेस्ट इंडिज समोर 430 धावांचा डोंगर उभा केला होता. अशातच पहिल्या डावात वेस्ट इंडिजची फलंदाजीही नाकामी ठरली. बांग्लादेशच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत वेस्ट इंडिजला 259 धावांतच रोखलं. त्यामुळे 171 धावांची आघाडी मिळालेला बांग्लादेश संघ उत्तम स्थितीत होता. तर दुसऱ्या डावात बांग्लादेशाने 223 धावांवर खेळ घोषित केला, त्यामुळे दुसऱ्या डावातील चौथ्या इनिंगसाठी वेस्ट इंडिजला 394 धावांची आवश्यकता होती. दुसऱ्या डावातील चौथ्या इनिंगमध्ये 394 धावांचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिजच्या 28 वर्षीय कायल मेयर्सने तुफानी खेळी केली आहे. त्याने 310 चेंडूत 210 धावा कुटल्या आहेत. यावेळी त्याने 20 चौकार आणि 7 षटकार ठोकले आहेत. त्याच्या या ऐतिहासिक खेळीने कायल मेयर्सने अनेक विश्वविक्रम स्वतःच्या नावावर केले आहेत. पदार्पणातच दुहेरी शकत ठोकणारा हा पाचवा खेळाडू ठरला आहे. कायल मेयर्सने हा पदार्पणातच चौथ्या इनिंग मध्ये द्विशतक ठोकणारा एकमेव फलंदाज बनला आहे. यापूर्वी चौथ्या इनिंगमध्ये पदार्पणात सर्वोच्च धावसंख्या 112 एवढी होती. वेस्ट इंडिजच्या कायल मेयर्सने नाबाद 210 धावा करत हा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. त्याने पदार्पणातच चौथ्या इनिंगमध्ये द्विशतक ठोकलं आहे. 144 वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासातली ही सर्वोच्च कामगिरी मानली जात आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 2,409 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये केवळ पाच जणांनी पदार्पणातच द्विशतक ठोकलं आहे. तर चौथ्या इंनिंगमध्ये द्विशतक ठोकणाऱ्या खेळाडूची संख्याही पाच आहे. पण पदार्पणातच चौथ्या इनिंगमध्ये द्विशतक ठोकणारा कायल मेयर्स हा एकमेव खेळाडू बनला आहे.