विकेटच सेलिब्रेशन पडलं महागात, स्ट्रेचरवरून न्यावं लागलं मैदाना बाहेर
मुंबई, 12 मार्च : क्रिकेट सामन्यादरम्यान एखाद्या फलंदाजांची विकेट घेतल्यावर गोलंदाज आणि विरुद्ध संघाकडून त्या प्रसंगाचे सेलिब्रेशन करणे हे फारच सामान्य आहे. परंतु दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्या दरम्यान एक विचित्र प्रकार घडला. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची विकेट घेतल्यावर अति उत्साहाच्या भरात सेलिब्रेशन करणे एका खेळाडूला महागात पडलं. त्यानंतर थेट त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्याची नामुष्की ओढवली. दक्षिण आफ्रिकेचा 33 वर्षीय फिरकीपटू केशव महाराजला शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात दुखापत झाली. जोहान्सबर्ग येथे झालेल्या या कसोटीच्या चौथ्या दिवशी केशव महाराजने 2.5 षटकांत चार धावा देताना दोन विकेट्स घेतल्या. तेव्हा वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर कायले मेयर्सच्या बाद होण्याचं सेलिब्रेशन करताना त्याला दुखापत झाली.
नेमकं काय घडलं ? दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकून मालिका आपल्या नावावर केली. या सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत होता. वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर कायले मेयर्स यावेळी क्रीजवर होता. दुसऱ्या डावातील 19 व्या षटकात गोलंदाज केशव महाराजने मेयर्ससाठी अपील केले. परंतु मैदानावरील अम्पायरने त्याला नाबाद दिले, परंतु महाराजने DRS घेतला. त्यामध्ये मेयर्स बाद असल्याचा निर्णय आला आणि महाराज सेलिब्रेशन करण्यासाठी धावला. मात्र अचानकपणे तो मैदानावर कोसळला. महाराजला झालेली ही दुखापत गंभीर असून त्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.