मुंबई, 1 जून : इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या (England vs New Zealand) टेस्ट सीरिजला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या 2 जूनला लॉर्ड्सच्या मैदानावर होणाऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा कॅप्टन जो रुट (Joe Root) सहभागी होईल का, याबाबत शंका निर्माण झाली आहे. सोमवारी सरावादरम्यान रूटच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्याने लगेच उपचार करून घेतले आणि तो पुन्हा मैदानात परतला. पण त्यानंतर त्याने सरावात भाग घेतला नाही. इंग्लंड टीमचे मुख्य कोच क्रिस सिल्व्हरवूड ‘थ्रो डाउन’चा सराव करून घेत असताना जोच्या उजव्या हाताला दुखापत झाली. तो उजव्या हाताने बॅटिंग (Right Handed Batsman) करतो त्यामुळे त्याला टेस्टमध्ये खेळता येईल का, याबद्दल शंका निर्माण झाली. नंतर लक्षात आलं की डॉग थ्रोअर या यंत्राचा उपयोग करून जो सराव करताना त्या बॉल लागला. पण इंग्लंड टीम प्रशासनाने मात्र याबद्दल खुलासा केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रूट मंगळवारी सराव सत्रात खेळणार नाही. तो पहिल्या टेस्टपूर्वी तंदुरुस्त होईल त्यामुळे तो न खेळण्याची शक्यता खूप कमी आहे, असं इंग्लंडच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे. तरीही जर तशी वेळ आलीच तर सॅम बिलिंग्ज इंग्लंडच्या टीमचं नेतृत्व करेल, असं इंग्लंड टीम प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. केन विल्यमसनच्या न्यूझीलंडविरुद्ध ही टेस्ट मॅच 2 जून पासून लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू होणार आहे. जो रूट हा इंग्लंडचा विश्वासार्ह बॅट्समन आहे. त्याने 2021 या वर्षात दोन द्विशतकं आणि एकदा 186 धावा केल्या आहेत. या वर्षात आतापर्यंत जगातील सर्वाधिक रन करणारा बॅट्समन होण्याचा मान रूटने मिळवला आहे. त्याने 2021 मध्ये 12 डावांमध्ये 66.16 च्या सरासरीने 794 रन केल्या असून त्याने भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये द्विशतक ठोकलं होतं. त्याआधी काही दिवस रूटने श्रीलंकेविरुद्ध 186 रन्स केल्या होत्या. अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध झालेल्या टेस्ट सामन्यात रूटने 8 रन देत 5 विकेट्स घेऊन आपल्या बॉलिंगचा जलवाही दाखवून दिला होता. 2021 या वर्षातील टेस्ट कामगिरीचा (Test Performance) विचार करता रूटइतक्या रन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतर खेळाडूने केलेल्या नाहीत. डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत जो म्हणाला, ‘गेल्या काही वर्षांत मी अनेक गोष्टी शिकलो आहे आणि माझा खेळ विकसित होतो आहे. भारतातील पराभवामुळे नक्कीच निराश झालो पण एक टेस्ट टीम म्हणून इंग्लंडची टीम विकसित होताना मी पाहतो आहे.’