चेन्नई, 08 फेब्रुवारी: भारत आणि इंग्लंड दरम्यान चेन्नई येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्माने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. इशांतचा हा वैयक्तिक 98 वा कसोटी सामना असून त्याने या सामन्यात 300 बळी पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा इशांत हा कसोटी क्रिकेट इतिहासातील 35 वा गोलंदाज आहे. भारतीय खेळाडूंबाबत बोलायचं झालं तर, 300 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तो सहावा गोलंदाज बनला आहे. यापूर्वी भारतासाठी अनिल कुंबळे (619), कपिल देव (434), हरभजन सिंग (382), रविचंद्रन अश्विन (382) आणि झहीर खान (311) यांनी 300 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. इशांत शर्माने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे पहिला कसोटी सामना खेळला होता. 300 विकेट्सचा टप्पा पूर्ण करण्यासाठी इशांतला 13 वर्षांचा काळ लागला. दुसरीकडे भारताचा स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विननेही या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अश्विन हा भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला पहिला फिरकीपटू बनला आहे, ज्याने डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवली आहे. चेन्नई कसोटीत इंग्लंडच्या दुसर्या डावात अश्विनने सलामीवीर रॉरी बर्न्सची विकेट घेतली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं फक्त तीन वेळा घडलं आहे. ज्यामध्ये एखाद्या स्पिनरने डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती. यापूर्वी, 1888 मध्ये बॉबी पील आणि 1907 मध्ये बर्ट वोगलरने अशी कामगिरी केली होती.
वॉशिंग्टन सुंदरची नाबाद 85 धावांची महत्त्वपूर्ण खेळी इंग्लडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशीची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी म्हणजे 21 वर्षीय वॉशिंग्टन सुंदरची संयमी फलंदाजी. यावेळी सुंदरने 12 चौकार व दोन षटकारांच्या मदतीने 138 चेंडूत नाबाद 85 धावा केल्या आहेत. त्याने लगातार दुसऱ्या कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पणातच पहिल्या डावात 62 धावा आणि दुसऱ्या डावात 22 धावा केल्या होत्या.