नवी दिल्ली, 5 मे : भारताचे माजी क्रिकेटपटू इरफान (Irfan Pathan) आणि युसूफ पठाण (Yusuf Pathan) हे पुन्हा एकदा गरजूंच्या मदतीला धावले आहेत. पठाण बंधूंची ऍकेडमी दक्षिण दिल्लीमधल्या कोरोना प्रभावित लोकांना मोफत जेवण देणार आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिल्ली ही सगळ्यात प्रभावित शहरांपैकी एक शहर आहे. भारताकडून 29 टेस्ट आणि 120 वनडे खेळलेल्या इरफान पठाणला मार्च महिन्यात कोरोनाची लागण झाली होती, तसंच युसूफ पठाणचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. दोघंही पठाण बंधू रायपूरमध्ये वर्ल्ड रोड सेफ्टी टी-20 सीरिज खेळले होते. इरफान पठाण याने ट्वीट करून गरजूंना मोफत जेवण देणार असल्याची माहिती दिली. ‘देशभरात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. गरजूंना मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे, त्यामुळे क्रिकेट ऍकेडमी ऑफ पठाण्स दक्षिण दिल्लीमध्ये गरजूंना मोफत जेवण देईल,’ असं इरफान त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला आहे.
याआधी पठाण बंधूंचे वडील मेहमूद खान यांनीही त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून बडोद्यात गरजूंना मोफत अन्न वाटप केलं होतं. कोरोनाच्या संकटात मदतीला येण्याची पठाण कुटुंबाची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी गरजूंना मदत केली. मागच्या वर्षी इरफान आणि युसूफ यांनी बडोद्याच्या स्थानिक प्रशासनाला 4 हजार मास्क दिले, हे मास्क नंतर नागरिकांना वाटण्यात आले. पठाण बंधूंनी बडोदो पोलिसांना रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सी व्हिटॅमीनच्या गोळ्याही दिल्या होत्या, यानंतर बडोदा पोलिसांनी त्यांचे आभारही मानले होते.