अबुधाबी, 26 सप्टेंबर : आयपीएलच्या रणधुमाळीत आज मुंबई इंडियन्स (MI) आणि आरसीबीच्या (RCB) संघामध्ये मुकाबला सुरू आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीने मुंबईसमोर 166 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आज सलग दुसऱ्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीनं शानदार अर्धशतक झळकावलं, त्यानं 42 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 51 धावा केल्या. मधल्या फळीतील फलंदाज ग्लेन मॅक्सवेलनेही उत्कृष्ठ फलंदाजी करत 37 चेंडूत 56 धावा चोपल्या. यामध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 गडी बाद केले. त्यानं शेवटच्या षटकांमध्ये आरसीबीला जास्त धावा काढण्यापासून रोखून धरले. त्याच्याशिवाय बोल्ट, चाहर आणि अॅडम मिलने यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
गेल्या सामन्यात 70 धावांची खेळी करणार देवदत्त आज शून्यावर बाद झाल्याने आरसीबीची खराब सुरुवात झाली. भुवनेश्वर कुमारच्या एका सुंदर फेकीवर तो बाद झाला. त्यामुळे 7 - 1 अशी स्थिती असताना विराटने श्रीकर भारतला साथीला घेत मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. संघाच्या 75 धावा झाल्या असताना राहुल चाहरच्या गोलंदाजीवर श्रीकर 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने आज तडाखेबाज फलंदाजीचा नमुना दाखवला. विराट कोहलीच्या साथीने त्याने मुंबईच्या गोलंदाजीला झोडपून काढलं. विराटच्या अर्धशतकानंतर मॅक्सवेलनेही शानदार अर्धशतक झळकावलं. त्यानंतर आलेल्या फलंदाजांना मात्र विशेष कामगिरी करता आली नाही. संघ असे - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (c), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत (w), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, शाहबाज अहमद, डॅनियल ख्रिश्चन, केली जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (c), क्विंटन डी कॉक (w), सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पंड्या, अॅडम मिल्ले, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट