चेन्नई, 19 फेब्रुवारी : आयपीएलच्या 2021 साठीच्या लिलावात (IPL Auction 2021) खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागली. दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर क्रिस मॉरिस (Chris Morris) हा आयपीएल इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) ने क्रिस मॉरिसला 16.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. आयपीएल लिलावात एकूण 292 खेळाडू सहभागी झाले होते, त्यापैकी 57 खेळाडूंवर 145 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. पण एकाच महिन्यापूर्वी सिडनी टेस्टमधला हिरो राहिलेल्या हनुमा विहारी (Hanuma Vihari) याला कोणत्याच टीमने विरत घेतलं नाही. हनुमा विहारीने आयपीएल लिलावात आपली बेस प्राईज 1 कोटी रुपये ठेवली होती. हनुमा विहारी हा सगळ्यात महागडा भारतीय खेळाडू होता, पण कोणत्याच टीमने हनुमा विहारीमध्ये रस दाखवला नाही. आयपीएल लिलावात धक्का लागणारा हनुमा विहारी हा काही पहिला भारतीय स्टार खेळाडू नाही. याआधी चेतेश्वर पुजारावरही (Cheteshwar Pujara) अनेक वर्ष टीमनी बोलीच लावली नाही. 2014 साली पुजारा शेवटची आयपीएल खेळला होता, यानंतर वारंवार त्याच्यावर बोली लागली नाही. यावर्षी मात्र चेन्नईच्या टीमने (CSK) पुजाराला विकत घेतलं आहे. चेन्नईने पुजारावर 50 लाख रुपयांची बोली लावली. हनुमा विहारी 2019 साली आयपीएलमध्ये खेळला, त्यावेळी तो दिल्लीच्या टीमचा भाग होता. त्यावर्षी विहारीने 2 मॅचमध्ये फक्त 4 रन केले, यानंतर दिल्लीने हनुमा विहारीला सोडून दिलं, तेव्हापासून विहारीवर कोणत्याच टीमने बोली लावली नाही. दिल्लीच्याआधी विहारी 2013 आणि 2015 साली हैदराबादकडून खेळला होता. तेव्हाही त्याला यश मिळालं नव्हतं. हनुमा विहारीने आयपीएलमध्ये 24 मॅच खेळून 284 रन केले आहेत. आयपीएलच्या यंदाच्या लिलावात बोली न लागल्यानंतर हनुमा विहारीने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. LOL असं लिहून विहारीने हसण्याचा इमोजी पोस्ट केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये सिडनी टेस्टवेळी बॅटिंग करताना हनुमा विहारीच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली. या दुखापतीमुळे हनुमा विहारीला चालताही येत नव्हतं, पण तरीही तो अश्विनसोबत मैदानात उभा राहिला आणि सिडनी टेस्ट ड्रॉ केली. यानंतर भारताने ब्रिस्बेन टेस्टमध्ये विजय मिळवत, लागोपाठ दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत पराभव केला आणि बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्वत:कडेच ठेवली.