मुंबई, 19 फेब्रुवारी: इंडियन प्रीमियर लीग सिझन 14 (IPL 2021) चा लिलाव सुरू होण्यापूर्वीपासून सर्वांचं लक्ष अर्जुन तेंडुलकरवर (Arjun Tendulkar) होतं. पाच तासांपेक्षा जास्त चाललेल्या खेळाडूंच्या लिलावामध्ये (IPL Auction) अर्जुन तेंडुलकरचं नाव सर्वात शेवटी पुकारण्यात आलं. त्यावेळी मुंबई इंडियन्सनं (MI) त्याला 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं. त्यामुळे आपले वडील आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यानंतर अर्जुनही आता मुंबई इंडियन्सचा सदस्य झाला आहे. अर्जुनची पहिली प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सनं निवडताच अर्जुन तेंडुलकरनं त्याची पहिली प्रतिक्रिया सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली आहे. फास्ट बॉलिंग ऑल राऊंडर असलेल्या अर्जुननं या निवडीबद्दल मुंबई इंडियन्सचे टीम मॅनेजमेंट आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. ‘मी लहानपणापासून मुंबई इंडियन्सचा कट्टर फॅन आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल टीमचे कोच, मालक आणि सपोर्ट स्टाफचा मी आभारी आहे. निळ्या आणि सोनेरी रंगाची टीमची जर्सी घालण्यापासून मी आता फार काळ थांबू शकत नाही,’ अशी प्रतिक्रिया अर्जुननं दिली आहे.
अर्जुननं काही दिवसांपूर्वीच 73 व्या पोलीस निमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेत (Police Invitation Shield Cricket Tournament 2020-2021) फक्त 31 बॉलमध्ये नाबाद 77 रनची आक्रमक खेळी केली. विशेष म्हणजे त्यानं यावेळी एकाच ओव्हरमध्ये पाच सिक्स लगावले होते. त्यानंतर 41 रन देऊन तीन विकेट्सही घेतल्या. अर्जुनच्या या कामगिरीच्या जोरावर एनआयजी क्रिकेट क्लबनं (MIG Cricket Club) इस्लाम जिमखान्याचा 194 रननं दणदणीत पराभव केला. त्याची ही कामगिरीच मुंबई इंडियन्सचं लक्ष वेधून घेण्यासाठी निर्णयाक ठरली आहे.