T20 लीगसाठी आयसीसी बनवणार नवा नियम
मुंबई, 13 जून : टी-20 क्रिकेट हे सध्या सर्वाधिक लोकप्रिय आहे. आयपीएल हिट झाल्यानंतर जवळपास प्रत्येक देशात टी-20 क्रिकेट लीगला सुरूवात झाली आहे. या लीग इंटरनॅशनल क्रिकेटसाठी धोका मानला जात आहे, कारण बहुतेक खेळाडू देशाकडून खेळण्याऐवजी अशाप्रकारच्या टी-20 लीगमध्ये खेळायला प्राधान्य देत आहेत. जगभरातल्या वाढत चाललेल्या टी-20 लीगबद्दल आयसीसी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. या टी-20 लीग्सबद्दल आयसीसी नवा नियम तयार करणार आहे. काहीच दिवसांपूर्वी जेसन रॉयने इंग्लंडसोबतचा त्याचा करार संपुष्टात आणला. अमेरिकेमध्ये होणाऱ्या टी-20 लीगमुळे रॉयने हा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजच्या टीमचे बरेच खेळाडूही परदेशातल्या लीगमध्ये खेळतात, पण ते वेस्ट इंडिजसाठी खेळत नाहीत. ब्रिटनचं वृत्तपत्र द टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार आयसीसी आता टी-20 लीगबद्दल पुढच्या काही महिन्यांमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. आयसीसी आता कोणत्याही देशात खेळल्या जाणाऱ्या टी-20 लीगच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये जास्तीत जास्त चार परदेशी खेळाडूंना परवानगी देण्याचा नियम आणणार आहे. हे चार परदेशी खेळाडू आयसीसीच्या फुलटाईम मेंबर टीमचा भाग असतील. असोसिएट देशांच्या खेळाडूंसाठी हा नियम लागू होणार नाही. या नियमामुळे या देशांच्या खेळाडूंना जास्त खेळण्याची संधी मिळेल. अनेक परदेशी टी-20 लीगमध्ये चार पेक्षा जास्त परदेशी खेळाडू खेळतात. नुकत्याच लॉन्च झालेल्या युएई इंटरनॅशनल टी-20 लीगच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये 9 परदेशी खेळाडूंना सामील केलं जाण्याची परवानगी देण्यात आली. अमेरिकेमध्ये खेळवण्यात येणाऱ्या मेजर लीग क्रिकेटमध्ये 6 खेळाडूंना प्लेयिंग इलेव्हनमध्ये सामील करण्याचा नियम करण्यात आला होता. बोर्डालाही द्यावे लागणार पैसे टी-20 लीगचं आयोजन करणाऱ्या क्रिकेट बोर्डाला आयसीसीच्या नव्या नियमामुळे खेळाडू ज्या बोर्डाचा असेल त्याला पैसे द्यावे लागणार आहेत. टी-20 लीगमध्ये खेळाडूला मिळणाऱ्या रकमेच्या 10 टक्के रक्कम क्रिकेट बोर्डाला देणं बंधनकारक होईल. ही रक्कम क्रिकेट बोर्डासाठी कमाईचं साधन होऊ शकते, ज्यामुळे क्रिकेट सुधारण्यास मदत होईल, असं आयसीसीला वाटत आहे. आयपीएलवर परिणाम नाही आयपीएलच्या पहिल्या मोसमापासूनच प्लेयिंग इलेव्हनमध्ये जास्तीत जास्त 4 परदेशी खेळाडूंना सामील करता येतं, त्यामुळे पहिल्या नियमामुळे आयपीएलवर कोणताही परिणाम होणार नाही.