मुंबई, 2 ऑक्टोबर : युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडमध्ये खेळाडू डोपिंग टेस्ट (Doping Test) पासून वाचू शकतात, कारण कोणत्याच खेळाडूची स्पर्धेदरम्यान डोप टेस्ट होणार नाही. बीसीसीआय (BCCI) कडक बायो-बबल नियमांचं पालन करत आहे. कोरोना व्हायरसची भीती लक्षात घेता नॅशनल ऍण्डी डोपिंग एजन्सी म्हणजेच नाडाच्या (NADA) अधिकाऱ्यांना आयपीएल बायो-बबलमध्ये जायची परवानगी देण्यात आलेली नाही. आयपीएल 2021 च्या पहिल्या राऊंडमध्येही कोरोना व्हायरसमुळे कमी डोप टेस्ट झाल्या होत्या. नाडाचे डीसीओ (डोपिंग नियंत्रण अधिकारी) कोरोना संक्रमित झाल्यानंतर बीसीसीआयने डोपिंग टेस्ट बंद केल्या. पहिल्या राऊंडवेळी बीसीसीआयने मुंबई, चेन्नई आणि दिल्लीमध्ये तीन डोप कंट्रोल स्टेशनना परवानगी दिली होती, पण अधिकाऱ्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर डोप टेस्ट बंद करण्यात आली. नाडाला भारतात होणाऱ्या कोणत्याही स्पर्धांमध्ये डोप टेस्ट करायला परवानगी असते. पण बीसीसीआयने परवानगी न दिल्यामुळे नाडाचा कोणताही अधिकारी युएईमध्ये गेला नाही. आयपीएलच्या पहिल्या राऊंडमध्ये बायो-बबलमध्येच अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. या अधिकाऱ्याने काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या डोपिंग टेस्ट केल्या होत्या. यानंतर बीसीसीआयने डोपिंग टेस्ट बंद केल्या, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं होतं. खेळाडूंना कोरोना झाल्यानंतर मे महिन्यात आयपीएल स्थगित करण्यात आली होती. बीसीसीआयकडून डोपिंग नियमांकडे दुर्लक्ष बीसीसीआय वाडाच्या नियमांपेक्षा स्वत:च्या डोपिंग नियंत्रण यंत्रणेला प्राधान्य देत आहे, त्यामुळे बोर्डावर टीका केली जाते. याआधी पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आला होता, त्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. तर युसूफ पठाण (Yusuf Pathan) आणि प्रदीप सांगवान (Pradeep Sangwan) यांनाही डोपिंग उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं होतं.