चेन्नई, 17 एप्रिल : आयपीएलमधली (IPL) सर्वाधिक यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सनी (Mumbai Indians) यावर्षीच्या लिलावामध्ये (IPL Auction 2021) युवा खेळाडूंना संधी दिली आहे. यातलाच एक आहे जम्मूचा युद्धवीर सिंग (Yudhavir Singh). झहीर खानने (Zaheer Khan) आयपीएल लिलावावेळी जेव्हा युद्धवीरचं नाव घेतलं तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले. 18 फेब्रुवारीला झालेल्या लिलावात युद्धवीरला मुंबईने 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं. जम्मूमध्ये जन्मलेला युद्धवीर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हैदराबादकडून खेळला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने हैदराबादचं प्रतिनिधीत्व केलं. मुंबई इंडियन्सने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये युद्धवीर सिंग लिलावावेळची आठवण सांगतो. ‘मी आणि माझं कुटुंब टीव्हीवर नजर ठेवून बसलो होतो. जर माझं नाव घेतलं गेलं, तर ते शेवटचं असेल, हे मी समजून गेलो होतो. जर नाव पुकारलं गेलं नाही, तर ठीक आहे. पण लिलावावेळी झहीरने माझं नाव घेतलं तेव्हा डोळ्यातून अश्रू यायला लागले,’ अशी प्रतिक्रिया युद्धवीरने दिली.
‘माझ्यासाठी ही गोष्ट अविश्वसनीय होती. मुंबई इंडियन्ससाठी निवड होणं माझं राज्य जम्मू-काश्मीरसाठीही महत्त्वाची गोष्ट होती. मी जम्मू-काश्मीरचं नाव रोशन करेन, अशी माझ्या टीमच्या सहकाऱ्यांची अपेक्षा होती,’ असंही युद्धवीर म्हणाला. 23 वर्षांच्या युद्धवीरने आतापर्यंत 2 प्रथम श्रेणी मॅच खेळल्या आहेत, यात त्याने 2 विकेट घेतल्या आहेत, याशिवाय त्याला 6 टी-20 सामन्यांमध्ये 3 विकेट मिळाल्या आहेत.