मुंबई, 10 ऑगस्ट : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या (IPL 2021) दुसऱ्या सत्राला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (Mumbai Indians vs Chennai Superkings) यांच्यामध्ये पहिला सामना होणार आहे. याआधी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) त्याच्या सरावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये अर्जुन बॅटिंगचा सराव करताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सची जर्सी घालून अर्जुन नेटमध्ये बॅटिंग करत आहे. बॅटिंगचा सराव करताना अर्जुनने धमाकेदार शॉट मारले. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अर्जुनने त्याच्या बॅटिंगचे 5 व्हिडिओ शेयर केले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये अर्जुनने मध्यमगती बॉलरला कव्हर ड्राईव्ह मारला, यानंतर पुढच्या बॉलवर त्याने बॅकफूट पंच लगावला. थ्रोडाऊन स्पेशलिस्टने टाकलेल्या यॉर्कर बॉलवर त्याने थर्ड मॅनला शॉट मारला. चौथ्या बॉलवर अर्जुनने डावखुऱ्या स्पिनरला स्वीप शॉट मारला. तर अखेरच्या बॉलवर कव्हर ड्राईव्ह मारला. अर्जुन तेंडुलकरचे शॉट बघून तो ऑफ साईड आणि लेग साईडलाही चांगला खेळू शकतो, हे दाखवून दिलं. आयपीएल 2021 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने अर्जुनला 20 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएल स्थगित होईपर्यंत मुंबईने 7 पैकी 4 मॅच जिंकल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या खात्यात 8 पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर दिल्ली, दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई आणि तिसऱ्या क्रमांकावर बँगलोर आहे. 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या उरलेल्या 31 मॅच सुरू होतील, तर 15 ऑक्टोबरला फायनल असेल.