चेन्नई, 14 फेब्रुवारी : आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या वर्षीचा लिलाव 18 फेब्रुवारीला होणार आहे. पण त्याआधी आयपीएलच्या टीमसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. दक्षिण आफ्रिका बोर्डाने शनिवारी पाकिस्तान दौऱ्याचं (South Africa vs Pakistan) वेळापत्रक जाहीर केलं आहे. पाकिस्तानची टीम एप्रिल महिन्यात तीन वनडे आणि चार टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. ही सीरिज 16 एप्रिलला संपणार आहे. त्यामुळे आयपीएलसाठी दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू पहिले दोन आठवडे उपलब्ध नसतील. पाकिस्तानविरुद्धची सीरिज संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भारतात येतील, पण त्यांना भारतात क्वारंटाईन व्हावं लागेल. यंदाच्या वर्षीची आयपीएल 11 एप्रिलपासून सुरू व्हायची शक्यता आहे. आयपीएल फ्रॅन्चायजीशी जोडला गेलेला एक अधिकारी म्हणाला, जर दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान यांच्यातली सीरिज 16 एप्रिलला संपत असेल, तर त्यांचे खेळाडू पहिले दोन आठवडे खेळू शकणार नाहीत, त्यामुळे याबाबत आम्ही बीसीसीआयकडे माहिती मागितली आहे. या हिशोबाने आम्हाला लिलावासाठीची रणनीती ठरवावी लागेल. लिलावामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या 14 खेळाडूंचा समावेश आहे, याशिवाय काही खेळाडूंना आयपीएल टीमनी रिटेन केलं आहे. फाफ डुप्लेसिस आणि लुंगी एनगिडी चेन्नईकडे, कागिसो रबाडा आणि एनरिच नॉर्किया दिल्लीकडे, डेव्हिड मिलर राजस्थानकडे आणि क्विंटन डिकॉक मुंबईकडे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय याबाबत क्रिकेट दक्षिण आफ्रिकेशी बोलणार आहे, आणि त्यानंतर फ्रॅन्चायजीना माहिती दिली जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेशिवाय इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंबाबतही संशय आहे. न्यूझीलंडला जून महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जायचं आहे. 2 जूनपासून या दोन्ही टीममध्ये दोन टेस्ट मॅचची सीरिज सुरू होणार आहे. या सीरिजच्या तयारीसाठी दोन्ही टीमचे कमीतकमी 10 खेळाडू इंग्लंडला जातील, त्याचवेळी आयपीएलचा अंतिम राऊंड सुरू झाला असेल.