सानिया मिर्झाच्या टेनिस कारकिर्दीला अखेर पूर्ण विराम
मुंबई, 6 मार्च : टेनिस खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव लौकिक वाढवणारी खेळाडू सानिया मिर्झा हिने रविवारी आपल्या शानदार कारकिर्दीचा समारोप केला. सानियाने 20 वर्षांपूर्वी लाल बहादूर टेनिस स्टेडिअममध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती, तर याच ठिकाणी काल प्रदर्शनीय सामना खेळून तिने आपल्या कारकिर्दीचा समारोप केला. सानियाने फेब्रुवारी 2023 मध्येच तिच्या आंतरराष्ट्रीय टेनिस कारकिर्दीचा निरोप घेतला आहे. तिने तिचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना डब्लूटीए दुबई ड्यूटी फ्री चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळला होता. पण तिला या स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या पहिल्याच फेरीत अमेरिकन जोडीदार मॅडिसन कीजबरोबर खेळताना पराभव स्विकारावा लागला होता. तसेच सानियाने जानेवारी 2023 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरी प्रकारात रोहन बोपन्नाबरोबर अंतिम सामना खेळला होता. हा तिचा अखेरचा ग्रँडस्लॅम सामना ठरला होता. Suryakumar Yadav : मुंबईच्या रस्त्यावर सूर्याचा हटके अंदाज, दाखवली त्याच्या खास शॉटची झलक आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती घेतल्यानंतर जिथून या टेनिसच्या प्रवासाला सुरुवात झाली त्याच हैद्राबाद येथील लाल बहादूर टेनिस स्टेडिअमवर अखेरचा सामना खेळायची इच्छा सोनियाची होती. तेव्हा रविवारी तिने अखेरच्या मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये रोहन बोपन्ना, इव्हान डोडिग, कारा ब्लॅक, बेथनी मॅटेक-सँड्स आणि मॅरियन बार्टोली यांच्यासोबत प्रदर्शनीय सामने खेळले. हे सामने पाहण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंह, रॅपर एम सी स्टॅन, तसेच अनेक सरकारी अधिकारी उपस्थित होते.
सानिया आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळताना भावूक झाली होती. ती आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाली, ‘मी आज मला ज्यांनी सेंड-ऑफ दिला, त्या सर्वांचेच आभार. मी यापेक्षा चांगली शेवटाची अपेक्षा करू शकत नव्हते. 2002 मध्ये कारकिर्दीची सुरुवात झाली, जेव्हा मी राष्ट्रीय स्पर्धेत मेडल जिंकले होते. त्यानंतर मी दुहेरीत पहिले डब्ल्यूटीएचे विजेतेपद जिंकले. 20 वर्षे देशाचे उच्च स्तरावर प्रतिनिधित्व करणे ही सन्मानाची गोष्ट आहे.’ ‘मी या खेळाला नक्कीच मिस करेल. पण मी हे नक्की सांगते की मी तेलंगणा सरकारबरोबर आणि क्रीडा प्राधिकरणाबरोबर पुढील सानिया निर्माण करण्यासाठी मी नेहमी असेन. खरंतर आपल्याला अजून अनेक सानिया हव्या आहेत आणि आपण त्यासाठी नक्की काम करू. माझ्या डोळ्यातून येणारे हे आनंदाश्रू आहेत. मी तुम्हा सर्वांना मिस करेल’, असं सानिया म्हणाली.
सोनिया मिर्झाची कारकीर्द : 36 वर्षीय सानियाने तिच्या कारकिर्दीत तब्बल 6 ग्रँड स्लॅम विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. तिने मिश्र दुहेरीत 2009 साली ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 साली फ्रेंच ओपन आणि 2014 साली अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे. त्याचबरोबर तिने महिला दुहेरीत 2015 साली विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन स्पर्धा, तसेच 2016 साली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे.