harmanpreet kaur
मुंबई, 20 फेब्रुवारी : आयसीसी महिला टी२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि आय़र्लंड यांच्यातल्या सामन्यात पावासने व्यत्यय आला. अखेर पाऊस न थांबल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला पाच धावांनी विजयी घोषित करण्यात आले. या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मैदानात पाऊल टाकताच हरमनप्रीतने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये विश्वविक्रमाची नोंद केली. हरमनप्रीतने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १५० सामने खेळले आहेत. इतके सामने खेळणारी ती पुरुष आणि महिला क्रिकेटरमध्ये एकमेव क्रिकेटर आहे. हरमनप्रीतनंतर टी२० क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्माचा नंबर लागतो. रोहित शर्माने आतापर्यंत १४८ टी२० सामने खेळले आहेत. तर तिसऱ्या स्थानी न्यूझीलंडची क्रिकेटर सूजी बेट्स असून तिने १४३ सामने खेळले आहेत. हेही वाचा : Womens T20 WC : टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये धडक, आयर्लंडवर 5 धावांनी विजय हरमनप्रीतने जून २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये कारकिर्दीला सुरुवात केली. पहिला सामना तिने इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्यात हरमनप्रीतला फक्त ८ धावा करता आल्या होत्या. दरम्यान, आतापर्यंत हरमनप्रीतच्या १५० सामन्यात ३००६ धावा झाल्या आहेत. हा माईलस्टोन गाठणारी हरमनप्रीत पहिली भारतीय महिला क्रिकेटर आहे. हरमनप्रीतने तिच्या कारकिर्दीत टी२० क्रिकेटमध्ये एका शतकासह ९ अर्धशतके केली आहेत. महिला टी२० वर्ल्ड कपमध्ये यावेळी तिला फारशी कमाल दाखवता आलेली नाही. सुरुवातीच्या चार सामन्यात तिला फक्त ६६ धावा करता आल्या.