माऊंट माउंगानुई, 11 फेब्रुवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यात होत असलेल्या तिसऱ्या सामन्यात भारत क्लीन स्वीपची नामुष्की टाळण्यासाठी खेळत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताला चांगली सुरुवात करता आली नाही. मात्र श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी भारताला डाव सावरला. श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर केएल राहुलने 104 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. भारताला या शतकाची गरज होती. केएल राहुलचे एकदिवसीय क्रिकेटमधील हे चौथे शतक आहे. त्यानं 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. त्याचबरोबर मनीष पांडेसोबत चांगली भागीदारीही करत आहे. केएल राहुल सुरैश रैनानंतर दुसरा खेळाडू ठरला आहे, ज्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन शतक पूर्ण केले. याआधी रैनाने 2015मध्ये अशी कामगिरी केली होती.
याआधी श्रेयस अय्यरने 62 धावांची खेळी केली होती. राहुल आणि अय्यर यांनी शतकी भागीदारी केल्यानंतर अय्यर बाद झाला. त्याआधी रोहित शर्माच्या दुखापतीमुळं सध्या पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल सलामीला फलंदाजी करत आहेत. या सामन्यात मयंक अग्रवाल 1 धाव करत बाद झाला. तर त्यानंतर कर्णधार विराट कोहली 9 धावांवर जेमिसनच्या हाती कॅच घेत बाद झाला. कोहलीने गेले कित्येक महिने एकही शतकी खेळी केलेली नाही आहे. न्यूझीलंडविरुद्ध तिन्ही सामन्यात कोहलीला चांगली कामगिरी करता आलेली नाही. मात्र या पृथ्वी शॉची विकेट सर्वात चर्चेचा विषय ठरत आहे. लॅथमच्या गोलंदाजीवर 2 धाव काढण्याच्या नादात पृथ्वी शॉ धावबाद झाला. दुसरी धाव नसतानाही पृथ्वी धावला आणि बाद झाला. या सामन्यात पृथ्वी शॉ चांगली कामगिरी करेल, असे वाटत होते. मात्र त्याने स्वत:च्या हाताने विकेट टाकली. पृथ्वी शॉने भारतानं चांगली सुरुवात करून दिली. मात्र 42 चेंडूत 40 धावा करत शॉ धावबाद झाला. 30 वर्षांत वनडे मालिकेत टीम इंडियाला मिळाला नाही क्लीन स्वीप न्यूझीलंडविरुद्धच्या सध्याच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ 2-0 ने पिछाडीवर आहे. न्यूझीलंडने तिसरा सामनाही जिंकल्यास 1990नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा भारतीय संघाला वनडे मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागणार आहे. 30 वर्षांपूर्वी टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 5-0 असा पराभव पत्करावा लागला होता. 2006मध्ये दक्षिण आफ्रिकेनेही भारताकडून 4-0 एकदिवसीय मालिका गमावली होती, परंतु त्यानंतर पावसामुळे पहिला वनडे सामना रद्द झाला होता.