ख्राइस्टचर्च, 01 मार्च : दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा सुमार कामगिरी केली. भारताचा दुसऱ्या दिवसाचा खेळ 90-6 धावांवर संपला. केवळ 90 धावांत भारतानं 6 विकेट गमावत 97 धावांची आघाडी घेतली आहे. सध्या हनुमा विहारी (5), ऋषभ पंत (1) फलंदाजी करत आहेत. दरम्यान, दुसऱ्या डावातही कर्णधार विराट कोहली पुन्हा सपशेल अपयशी ठरत 14 धावांवर बाद झाला. दुसऱ्या डावातील दुसऱ्याच ओव्हरमध्ये भारतानं पहिली विकेट गमावली. मयंक अग्रवाल केवळ 3 धावा करत माघारी गेला. त्यामुळं या डावातही सलामीवीरांना चांगली खेळी करता आली नाही. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र सलग चौथ्या डावात विराट मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यानंतर भारतीय फलंदाजांची एकामागोमाग एक रांग लावली. कोहलीनंतर लगेचच अजिंक्य रहाणे 9 धावांवर, पुजारा 24 तर उमेश यादव एक धाव करत माघारी परतला.
याआधी न्यूझीलंडच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांची चांगली कामगिरी केली. पहिल्या दोन सेशनमध्ये बुमराह, शमीच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडचे फलंदाज टिकू शकले नाही. मात्र कॉलिन डी-ग्रँडहोम आणि कायल जॅमिसन यांनी भारतीय गोलंदाजांना रडवलं. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत न्यूझीलंडला चांगल्या स्थितीत पोहचवले. याआधी कायलने 5 विकेट घेत भारतीय फलंदाजाचे कंबरडे मोडले होते. तर, फलंदाजीमध्ये त्यानं 49 धावांची खेळी केली. त्यामुळं दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या संघाने 235 धावांपर्यंत मजल मारली. तळाच्या फलंदाजांमुळे चांगली गोलंदाजी करूनही भारताला केवळ 7 धावांची आघाडी मिळाली आहे. पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा खेळ 63-0वर थांबला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाच उमेश यादवने भारताला पहिले यश मिळवून दिले. टॉम ब्लंडेल 30 धावांवर बाद झाल्यानंतर केन विल्यम्सनलाही बुमराहनं 3 धावांवर बाद केले. न्यूझीलंडची मधली फळी अयशस्वी ठरली असली तरी, तळाच्या फलंदाजांची चांगली कामगिरी केली. भारताकडून मोहम्मद शमीने 4, जसप्रीत बुमराहने 3, उमेश यादवने 1 तर रवींद्र जडेजाने कायलला बाद करत न्यूझीलंडचा डाव संपवला. भारताचा पहिला डाव 242 धावांवर संपला. पहिल्या डावात भारताच्या फलंदाजांनी सुमार कामगिरी केली. पृथ्वी शॉ (54), चेतेश्वर पुजारा (54)आणि हनुमा विहारी (55) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात सर्वबाद 242 धावा केल्या. न्यूझीलंडने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताच्या मधल्या फळीला चांगली कामगिरी करता आली नाही, मात्र शमी आणि बुमराहनं यांनी दहाव्या विकेटसाठी 26 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडकडून कायल जेमीसनने 5 विकेट घेतल्या.भारताकडून सलामीसाठी उतरलेल्या मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ यांनी केवळ 30 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मयंक अग्रवाल 7 धावा करत बाद झाला. मात्र पुजारा आणि पृथ्वी शॉ यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली, तर पृथ्वी शॉनं या दौऱ्यातील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. मात्र शॉला मोठी खेळी करता आली नाही, जेमिसनच्या चेंडूवर शॉ 54 धावा करत बाद झाला. शॉ बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानावर आला. पहिल्या कसोटी सामन्यात फ्लॉप खेळी केलेल्या कोहलीला पुन्हा दणक्यात पुनरागमन करण्याची संधी होती. मात्र कोहली 3 धावा करत बाद झाला, साउदीनं टाकलेल्या आउटस्विंग चेंडूवर कोहली सावध खेळायला गेला पण बाद झाला. कोहलीनं रिव्ह्युही घेतला, मात्र भारताचा आणखी एक रिव्ह्यु अयशस्वी ठरला. तर अजिंक्य रहाणेही 7 धावांवर बाद झाला.