**ऑकलंड, 08 फेब्रुवारी :**न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या पराभवामुळे टीम इंडियाचा वनडे मालिकेतही पराभव पत्कारावा लागला आहे. भारताविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0ने खिशात घातली आहे. भारतापुढे न्यूझीलंडने 274 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दुसऱ्या वनडे सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यर (52) आणि रवींद्र जडेजाने (55) धावांची अर्धशतकी खेळी केली तर, जवळपास 6 महिन्याने टीम इंडियाच्या वनडे संघात पुनरागमन केलेल्या फिरकीपटू युजवेंद्र चहलने 3 महत्त्वपूर्ण विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली.
पहिल्या वनडे सामन्यात पराभव पत्कारावा लागल्यामुळे टीम इंडियासाठी दुसरा वनडे सामना अत्यंत महत्त्वाचा होता. मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारताला विजय मिळवणं आवश्यक होतं. परंतु, श्रेयस अय्यर (52), रवींद्र जडेजा (55) आणि नवदीप सैनी (45) आणि युजवेंद्र चहल (58 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स) यांच्या व्यतिरिक्त टीम इंडियाच्या कोणत्याही खेळाडूची चमकदार कामगिरी दिसली नाही. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी अनुक्रमे 24 आणि 3 धावाच केल्या. तर, दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार आणि रनमशिन विराट कोहलीलाही 15 धावाच कुटता आल्या. लोकेश राहुल (4), केदार जाधव (9), शार्दुल ठाकूर (18) तर, युजवेंद्र चहल (10) धावांवर बाद झाले. नाणेफेक जिंकून भारताने सर्वप्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर, न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली. न्यूझीलंडच्या संघाने 273 धावा कुटत टीम इंडियासमोर 274 धावांचं आव्हान ठेवलं. दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाला अपयश आल्याने न्यूझीलंडने ही वनडे मालिका 2-0ने खिशात घातली आहे.