चेन्नई, 10 जानेवारी : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England) 227 रनने दारूण पराभव झाला. इंग्लंडचा भारतीय जमिनीवरचा हा सगळ्यात मोठा विजय आहे, तर दुसरीकडे चेन्नईच्या मैदानात 22 वर्षानंतर टीम इंडियाने टेस्ट मॅच गमावली. या मॅचमधला विराट कोहली (Virat Kohli)चा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मॅचच्या चौथ्या दिवशी अश्विनच्या (R Ashwin) बॉलिंगवर इंग्लंडचा खेळाडू जोफ्रा आर्चर (Jofra Archer) खेळपट्टीच्या मधून रन काढण्यासाठी धावला, त्यावेळी विराटने अंपायरकडे त्याची तक्रार केली. ही तक्रार करताना विराटने अंपायरचा एकेरी उल्लेख केला. ‘ओये मेनन सीधे रन भी बीच मे भाग रहा है यार, क्या है ये?’ असं विराट अंपायरना म्हणाला. विराटचा हा आवाज स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झाला.
भारत-इंग्लंड यांच्यातल्या टेस्टसाठी अनिल कुमार चौधरी (Anil Kumar Chaudhary) आणि नितीन मेनन (Nitin Menon) हे अंपायर होते. खरं तर टेस्ट मॅचसाठी न्युट्रल अंपायर ठेवले जातात, पण कोरोनामुळे प्रवासावर बंधनं आल्यामुळे आयसीसीने या नियमांमध्ये बदल केले. आता ज्या देशात टेस्ट मॅच असेल त्या देशातलेच अंपायर टेस्ट मॅचसाठी मैदानात उतरतात. न्युट्रल अंपायरचा नियम तात्पुरता स्थगित केल्यामुळे आयसीसीने डीआरएसची संख्याही वाढवली आहे. प्रत्येक टीमला एका इनिंगमध्ये 3 अयशस्वी डीआरएस घेता येतात. याआधी ही संख्या 2 होती.