अहमदाबाद, 11 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 3-1 ने विजय मिळवल्यानंतर भारतीय टीम (India vs England) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (ICC World Test Championship Final) पोहोचली. भारताच्या या कामगिरीमुळे कर्णधार विराट कोहली खूश आहे. कोरोना व्हायरसच्या काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय टीमने तिन्ही फॉरमॅटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. क्रिकेटच्या सगळ्यात छोट्या फॉरमॅटमध्येही भारतीय टीम मेहनत करत आहे, कारण याचवर्षी भारतात टी-20 वर्ल्ड कपही होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 12 मार्चपासून 5 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात होणार आहे. या सगळ्या मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत. ही सीरिज म्हणजे टी-20 वर्ल्ड कपआधीची रंगीत तालीम मानली जात आहे. या सीरिजमध्ये विराट कोहली (Virat Kohli) ची नजर एका मोठ्या विक्रमावर आहे. हा विक्रम करणारा विराट पहिलाच खेळाडू ठरेल. विराटच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये 2,928 रन आहेत. या सीरिजमध्ये त्याने 72 रन केल्या, तर तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 हजार रन पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरेल. विराटने 85 टी-20 मॅचमध्ये 50.48 च्या सरासरीने आणि 138.43 च्या स्ट्राईक रेटने 2,928 रन केले आहेत. यामध्ये 25 अर्धशतकांचा समावेश आहे. विराटचा सर्वाधिक स्कोअर नाबाद 94 रन आहे. एकूण टी-20 क्रिकेटमध्ये विराटने 299 मॅचमध्ये 41.30 ची सरासरी आणि 133.95 चा स्ट्राईक रेटने 9,500 रन केले आहेत, यामध्ये 5 शतकं आणि 68 अर्धशतकं आहेत, पण त्याला आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एकही शतक करता आलेलं नाही. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक रन विराट कोहली - 2,928 रोहित शर्मा - 2,839 मार्टिन गप्टिल - 2,773 एरॉन फिंच - 2,346 शोएब मलिक - 2,335 जर कोहलीला पहिल्या मॅचमध्ये 3 हजार रनचा टप्पा गाठता आला नाही, तर या सीरिजमध्ये मात्र तो निश्चितचा या विक्रमाला गवसणी घालू शकतो. विराट कोहलीचं शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 साली झालं होतं. यानंतर तो मर्यादित ओव्हरमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे, पण त्याला शतक करता आलेलं नाही. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आणि वनडे सीरिजमध्ये विराटच्या शतकाचा दुष्काळ संपेल, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.