अहमदाबाद, 21 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 मध्ये भारताचा (India vs England) 36 रननी दणदणीत विजय झाला. या विजयासोबतच भारताने ही सीरिज 3-2 ने जिंकली. या विजयानंतर बीसीसीआयने टीम इंडियाचा एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला. या फोटोमध्ये डाव्या बाजूच्या कोपऱ्यात बसलेल्या मुलीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आजूबाजूला सगळे पुरूष असताना ही महिला टीम इंडियासोबत दिसत आहे. टीम इंडियासोबत असलेल्या या महिलेचं नाव आहे राजल अरोरा (Rajal Arora). टीम इंडियाची सोशल मीडिया राजल अरोरा बघते. खेळाडूंचे फोटो तसंच मॅच संपल्यानंतरच्या त्यांच्या प्रतिक्रिया, खेळाडू कशापद्धतीने सराव करतात आणि त्यांच्या मुलाखतींचे व्हिडिओ राजल बीसीसीआयच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करते.
राजल अरोराच्या ट्वीटर अकाऊंटवर तिचा उल्लेख बीसीसीआयची सिनियर प्रोड्युसर असा आहे. 2019 वर्ल्ड कपमध्येही राजल अरोरा टीम इंडियासोबत इंग्लंडमध्ये होती. टीम इंडियाच्या फेसबूक, इन्स्टाग्राम पेजवर तसंच ट्वीटर अकाऊंटवरच्या फॉलोअर्सची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. या सगळ्या चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंची माहिती देण्याचं काम राजल अरोरा करते. राजल अरोराने तिच्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवरही टीम इंडियासोबतच्या खेळाडूंचे फोटो पोस्ट केले आहेत.
प्रत्येक दौऱ्यामध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत त्यांचा सपोर्ट स्टाफही असतो. यामध्ये सगळ्या प्रशिक्षकांसह डॉक्टर, फिजियो, थ्रो डाऊन एक्सपर्ट, व्हिडिओ ऍनलिस्ट, मसाज थेरपिस्ट, टेक्निशियन यांच्यासह अनेकांचा सहभाग असतो, पण बहुतेकवेळा टीम इंडियातली ही माणसं चाहत्यांसमोर येत नाहीत.