मुंबई, 16 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली पाच टी-20 मॅचची सीरिज अहमदाबादमध्ये खेळवली जात आहे. या सीरिजची शेवटची मॅच 20 मार्चला खेळवली जाणार आहे. यानंतर दोन्ही टीममध्ये तीन वनडे मॅचची सीरिज होईल. त्यामुळे लवकरच भारताच्या वनडे टीमची घोषणा करण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. यात कर्नाटकचा फास्ट बॉलर प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांची निवड होऊ शकते. या दोन्ही खेळाडूंनी नुकत्याच संपलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) चांगली कामगिरी केली होती. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार या दोन्ही खेळाडूंचा वनडे सीरिजसाठी संधी मिळू शकते. प्रसिद्ध कृष्णाने विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्नाटककडून खेळताना 7 मॅचमध्ये 22.2 च्या सरासरीने 14 विकेट घेतल्या. या मोसमात तो कर्नाटकचा सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर होता. त्याच्या या शानदार बॉलिंगमुळे कर्नाटक या मोसमात सेमी फायनलमध्ये पोहोचली, पण त्या सामन्यात मुंबईचा 72 रनने विजय झाला. सेमी फायनलमध्येही प्रसिद्धने तीन विकेट घेतल्या होत्या. दुसरीकडे कृणाल पांड्यानेही बडोद्यासाठी ऑलराऊंड कामगिरी केली. कृणाल या मोसमात बडोद्यासाठी सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. 5 मॅचमध्ये त्याने 129 पेक्षा जास्तच्या सरासरीने 388 रन केले, यात दोन शतकं आणि दोन अर्धशतकांचाही समावेश होता. तसंच त्याने 5 विकेटही घेतल्या. शॉ-पडिक्कलला संधी नाही? या दोन खेळाडूंशिवाय देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांच्यावरही निवड समितीची नजर असेल. शॉच्या नेतृत्वात यावर्षी मुंबईने विजय हजारे ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. शॉ या स्पर्धेच्या इतिहासाताला एका मोसमात सर्वाधिक रन करणारा खेळाडू ठरला. त्याने 8 मॅचमध्ये 165 च्या सरासरीने 827 रन केले. यात 4 शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. कर्नाटकचा ओपनर देवदत्त पडिक्कलने 7 मॅचमध्ये 147 पेक्षा जास्तच्या सरासरीने 737 रन केले. या सगळ्या मॅचमध्ये त्याने 50 पेक्षा जास्त रन केले. पण शिखर धवन, केएल राहुल, रोहित शर्मा आणि शुभमन गिल टीममध्ये असताना या दोघांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. दोन्ही टीममध्ये तीन वनडे 23, 26 आणि 28 मार्चला पुण्यात होणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही.