अहमदाबाद, 19 मार्च : जोफ्रा आर्चरची (Jofra Archer) जुनी ट्वीट आपण अनेक वेळा काही वर्षांनंतर सत्यात उतरल्याचं पाहिलं आहे. 2019 वर्ल्ड कपची फायनल सुपर ओव्हरमध्ये जाईल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 21 दिवसांचा कर्फ्यू, जो बायडेन अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष, अशी आर्चरने केलेली जुनी ट्वीट खरी झाल्यानंतर अनेकवेळा व्हायरल झाली. यानंतर आता भारताविरुद्धच्या चौथ्या टी-20 मॅचनंतर (India vs England) आर्चरचं तीन वर्ष जुनं ट्वीट पुन्हा एकदा व्हायरल झालं. 17 व्या ओव्हरमध्ये शार्दुल ठाकूरने बेन स्टोक्स आणि इयन मॉर्गन यांना लागोपाठ दोन बॉलवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं, यानंतर इंग्लंडला 186 रनचं आव्हान पार करणं कठीण झालं. क्रिस जॉर्डन आणि जोफ्रा आर्चर यांनी मात्र हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत नेला. इंग्लंडला शेवटच्या 3 बॉलवर विजयासाठी 10 रनची गरज होती. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर आर्चरच्या बॅटच्या खालच्या कडेला बॉल लागला, त्यामुळे त्याची बॅट तुटली आणि इंग्लंडचं विजयाचं स्वप्नही भंगलं. 7 मार्च 2018 रोजी जोफ्रा आर्चरने एक ट्वीट केलं होतं. बॅट दुरुस्त करणारा युकेमध्ये कोणी आहे का? असं ते ट्वीट होतं, मॅच संपल्यानंतर काही वेळातच हे ट्वीट व्हायरल झालं.
चाहत्यांनीही आर्चरच्या या ट्वीटवर मजेशीर कमेंट केल्या.
सूर्यकुमार यादवने आपल्या पदार्पणाच्या इनिंगमध्येच अर्धशतकी खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आपल्या पहिल्याच बॉलवर सूर्यकुमारने जोफ्रा आर्चरच्या बाऊन्सरवर पूल शॉट खेळून सिक्स मारला. सूर्याने त्याच्या या खेळीत 3 सिक्स आणि 6 फोर फटकावले. या अर्धशतकी खेळीबद्दल सूर्यकुमार यादवला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. 5 टी-20 मॅचची ही सीरिज सध्या 2-2ने बरोबरीत आहे. सीरिजची फायनल शनिवारी खेळवण्यात येणार आहे.