अहमदाबाद, 12 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाचा (India vs England) 8 विकेटने लाजीरवाणा पराभव झाला. भारताने ठेवलेलं 125 रनचं आव्हान इंग्लंडने 15.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. जेसन रॉयने (Jason Roy) सर्वाधिक 49 रन केले, तर जॉस बटलरने (Jos Buttler) 28 रनची खेळी केली. डेव्हिड मलान 24 रनवर नाबाद आणि जॉनी बेयरस्टो 26 रनवर नाबाद राहिला. भारताकडून युझवेंद्र चहलला एक आणि वॉशिंग्टन सुंदरला एक विकेट मिळाली. त्याआधी बॅटिंग करताना श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) एकाकी अर्धशतकी झुंज वगळता भारताचे सगळे खेळाडू अपयशी ठरले. 20 ओव्हरमध्ये भारतीय टीमला फक्त 124-7 पर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडच्या या विजयानंतर माजी क्रिकेटपटू मायकल वॉन (Michael Vaughan) याने टीम इंडियाला खिजवणारं ट्विट केलं. मुंबई इंडियन्सची टीम भारतीय टीमपेक्षा चांगली असल्याचा टोला मायकल वॉनने लगावला. मायकल वॉनच्या या ट्विटला भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनेही (Wasim Jaffer) सडेतोड प्रत्युत्तर दिलं. टीममध्ये चार परदेशी खेळाडू खेळवण्याचं नशीब प्रत्येक टीमला लाभत नाही मायकल, असं जाफर म्हणाला.
इंग्लंडच्या टीममध्ये खेळलेले बेन स्टोक्स (Ben Stokes), इयन मॉर्गन (Eoin Morgan), जेसन रॉय, जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आणि राशिद खान (Rashid Khan) हे खेळाडू परदेशात जन्म झालेले आहेत. क्रिकेट खेळण्यासाठी हे खेळाडू इंग्लंडमध्ये आले आणि नंतर त्यांची इंग्लंडच्या राष्ट्रीय टीममध्येही निवड झाली. यावरूनच वसीम जाफरने मायकल वॉनवर निशाणा साधला.