WTC Final : रोहितच्या मदतीला धावून आला विल्यमसन
मुंबई, 13 मार्च : न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 2 विकेट्सने पराभव केला. श्रीलंकेच्या पराभवामुळे भारताने थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या फायनलच तिकीट गाठलं असून आता भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपचा अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.
न्यूझीलंडच्या हॅगली ओव्हल स्टेडियमवर श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना पारपडला. या सामन्यात श्रीलंकेने विजयासाठी दिलेलं आव्हान पूर्ण करून न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. या कसोटी मालिकेत श्रीलंकेचा हा पराभव भारताच्या पचनी पडला आणि भारताने थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपचा अंतिम सामना गाठला आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा इंदोर येथील तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने सर्व प्रथम आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपचा अंतिम सामना गाठला होता. आता 7 जून ते 11 जून या दरम्यान आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपचा अंतिम सामना लंडन येथे खेळवला जाईल.
अहमदाबाद येथील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया घेत असलेली आघाडी पाहून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठू शकेल का? यावर प्रश्नचिन्ह होते. परंतु अशावेळी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन रोहित शर्माच्या संघासाठी धावून आला.
भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठली परंतु भारताच्या या यशामागे न्यूझीलंडच्या केन विल्यमसनचा मोठा वाटा आहे. श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंड समोर विजयासाठी 285 धावांच आव्हान ठेवलं होत. हे आव्हान पूर्ण करताना सुरुवातीला न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली परंतु काही वेळाने श्रीलंकेच्या भेदक गोलंदाजी समोर न्यूझीलंडचे एका पाठोपाठ एक 5 खेळाडू बाद झाले. या विकेट्सनंतर सामन्याला मोठी कलाटणी मिळू शकेल असे वाटत होते, पण न्यूझीलंडचा झुंजार कर्णधार केन विल्यमसनने 121 अशी नाबाद खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. या विजयामुळे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्याचा निकाल लागण्यापूर्वीच भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठली.