कोलंबो, 27 जुलै : भारतीय क्रिकेट टीम सध्या श्रीलंकेच्या (India vs Sri Lanka) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातल्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा 2-1 ने विजय झाला, तर टी-20 सीरिजमध्ये भारतीय टीम 1-0 ने आघाडीवर आहे. वनडे सीरिजच्या तिसऱ्या मॅचदरम्यान टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका (Dasun Shanaka) यांच्यात चर्चा झाली. या दोघांमधल्या चर्चेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तसंच अनेकांनी राहुल द्रविड याचं कौतुकही केलं. राहुल द्रविडने श्रीलंकेच्या कर्णधारासोबत नेमकी काय चर्चा केली असेल? असा प्रश्न अनेकांना पडला. आता या दोघांमध्ये झालेल्या चर्चेचं गुपित उलगडलं आहे. द्रविडने शनाकाच्या नेतृत्वाचं कौतुक केलं, तसंच श्रीलंकेच्या प्रयत्नांचीही प्रशंसा केली. श्रीलंकेच्या गेल्या काही काळातल्या खराब फॉर्मनंतर या सीरिजमध्ये त्यांची कामगिरी सुधारली, त्यामुळे ते कौतुकास पात्र आहेत, असं द्रविडने शनाकाला सांगितलं.
द मॉर्निंग डॉट एलके ने दिलेल्या वृत्तानुसार राहुल द्रविड शनाकाला म्हणाला, ‘तू चांगल्या पद्धतीने टीमचं नेतृत्व करत आहेस. संपूर्ण टीम कौतुकास पात्र आहे. श्रीलंकेच्या कामगिरीमुळे मला आश्चर्य वाटलं. दुसऱ्या वनडेमध्ये रोमांचक सामन्यात तुमचा पराभव झाला.’ भारतीय टीम दुसरी वनडे जिंकण्याच्या स्थितीमध्ये नव्हती, पण फास्ट बॉलर दीपक चहरने आपल्या बॅटने मॅच फिरवली. भारताची अवस्था 193/7 अशी होती, पण दीपक चहरने नाबाद 69 रन केले, त्याला भुवनेश्वर कुमारनेही साथ दिली, त्यामुळे भारताने हा सामना जिंकला आणि वनडे सीरिजमध्येही विजय मिळवला. तिसऱ्या वनडेमध्ये मात्र भारताला पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंकेच्या टीममध्ये एकजुटता आणि सुधारणा दिसत आहे, याशिवाय कोणतीच टीम जिंकू शकत नाही, असंही द्रविड शनाकासोबत बोलताना म्हणाला.