PHOTO- BCCI
लखनऊ, 24 फेब्रुवारी : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs Sri Lanka 1st T20) 62 रननी दणदणीत विजय झाला आहे. भारताने दिलेल्या 200 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 137 रनच करता आल्या. चरिथा असलंकाने सर्वाधिक 53 रनची नाबाद खेळी केली. भारताकडून भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर युझवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून तब्बल 199 रन केले. इशान किशनने (Ishan Kishan) 56 बॉलमध्ये 89 रनची खेळी केली, यामध्ये 10 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. तर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) 28 बॉलमध्ये 57 रनवर नाबाद राहिला. श्रेयस अय्यरने 5 फोर आणि 2 सिक्स लगावले. रोहित शर्माने 32 बॉलमध्ये 44 रनची खेळी केली. श्रीलंकेकडून लाहिरु कुमारा आणि दासुन शनाका यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. टी-20 आंतरराष्ट्रीय मधला टीम इंडियाचा हा लागोपाठ 10 वा विजय आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड, नामिबिया यांचा पराभव केला. तसंच न्यूझीलंडचा 3-0 आणि वेस्ट इंडिजचाही 3-0 ने पराभव केला. भारत आणि श्रीलंका यांच्यातली दुसरी टी-20 मॅच आता शनिवारी धर्मशालामध्ये खेळवली जाणार आहे.